कोच्ची : केरळमधील एर्नाकुलममधील कलामासेरी येथे एका कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पाच भीषण स्फोट झाले आहेत. माहितीनुसार, स्फोट झाला तेव्हा कन्व्हेन्शन सेंटरमध्ये यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रार्थना सुरू होत्या. या स्फोटात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर 35 जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, केरळ बॉम्बस्फोटाच्या मुद्द्यावर गृहमंत्री अमित शहा यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे.
मुख्यमंत्री पिनराई विजयन म्हणाले, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. आम्ही घटनेचा तपशील गोळा करत आहोत. एर्नाकुलममध्ये सर्व उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित आहेत. डीजीपी घटनास्थळी जात आहेत. आम्ही हे अतिशय गांभीर्याने घेत आहोत. मी डीजीपीशी बोललो आहे. तपासानंतर अधिक माहिती घ्यावी लागेल. सध्या एकाचा मृत्यू झाला असून दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. काहींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एनआयएचे ४ सदस्यीय पथक घटनास्थळी जात आहे. कोची शाखा कार्यालयातून निघालेल्या एनआयएच्या पथकासोबत स्थानिक पोलीसही घटनास्थळी जाऊन तपास करणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित तीन दिवसीय कार्यक्रमाचा आज शेवटचा दिवस होता. हा स्फोट कसा झाला आणि कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. ज्या हॉलमध्ये हा स्फोट झाला त्याची क्षमता 2 हजार लोकांची असून स्फोटाच्या वेळी 100-150 लोकांची उपस्थिती होती. या स्फोटाबाबत पोलिसांकडून अद्याप कोणतेही वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.