अमजद खान|कल्याण: राज्यात सध्या राजकीय घडामोडीना प्रचंड वेग आलेला आहे. अशातच केंद्रातील भाजपने महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत केले असल्याचे दिसून येत आहे. येत्या रविवारपासून माहिती प्रसारण केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांचा बुधवार पर्यंत कल्याण लोकसभा दौरा आयोजित करण्यात आला आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने १६ मतदारसंघात लक्ष केंद्रित केलं आहे. या १६ मतदारसंघात कल्याण लोकसभा मतदार संघाची निवड करण्यात आली आहे. कल्याण लोकसभा मतदार संघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे खासदार आहेत. भाजपने १६ मतदारसंघात कल्याण लोकसभा मतदार संघाची निवड करण्यात आल्याने, या मतदार संघावर भाजप दावा करणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे.
२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने जे मतदारसंघ याआधी भाजपच्या वाट्याला आलेले नाहीत, असे महाराष्ट्रातील १६ लोकसभा मतदार संघावर लक्ष केंद्रित केलं आहे .या लोकसभा मतदार संघात भाजपाचे केंद्रीय मंत्री दौरा करणार आहेत. यामध्ये कल्याण लोकसभा मतदार संघाचा देखील समावेश आहे.
कल्याण लोकसभा मतदार संघाचे प्रभारी संजय केळकर यांनी आज पत्रकार परिषद घेत येत्या ११ ,१२,१३ तारखेला माहिती प्रसारण केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर कल्याण लोकसभा मतदार संघाचा दौरा करणार असल्याचे सांगितले. यावेळी कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे हे देखील उपस्थित होते.
११ तारखेला ते डोंबिवली मध्ये येणार असून डोंबिवली मधील भाजप चे पदाधिकारी ,संघाच्या ज्येष्ठ कार्यकर्ते ,संवाद भेट घेणार आहेत ,सरकारच्या विविध योजनांचे लाभार्थीशी संवाद साधणार आहेत, डोंबिवली कल्याण ग्रामीण अंबरनाथ उल्हासनगर या चारी मतदार संघात या तीन दिवसांमध्ये दौरा केला जाणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात शतप्रतिशत भाजप विजयी कसे होईल या दृष्टीने भाजप प्रयत्नशील असून या पार्श्वभूमीवर पुढील परिणाम 15 महिन्यात कल्याण लोकसभा मतदारसंघात विविध ठिकाणी केंद्रीय मंत्र्यांच्या दौरे आयोजित करण्यात आल्याची माहिती संजय केळकर यांनी दिली.
दरम्यान कल्याण लोकसभा मतदार संघ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र यांचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा बालेकिल्ल्ला आहे . भाजपाचा पाठिंबा मिळवत एकनाथ शिंदे हे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. सध्या शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये शिवसेना कुणाची याबाबत न्यायालयीन लढा सुरु आहे. असे असताना डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मतदार संघात भाजपने लक्ष केंद्रित केल्याने राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा रंगल्या आहेत.