विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्या उपस्थितीमध्ये आज औरंगाबाद (Aurangabad) येथे पाण्यासाठी जलआक्रोश मोर्चा करण्यात येणार आहे.
औरंगाबाद (Aurangabad) शहरात आठ-आठ दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या आंदोलनात तब्बल 30 हजार लोक सहभागी असतील अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी दिली असून औरंगाबाद शहरात पाणी प्रश्न हा कायम असताना राज्य सरकारला धारेवर धरण्यासाठी हा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis )यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघणार आहे. लोकमान्य टिळक स्मारक पैठण गेट ते महानगरपालिका पर्यंत हा मोर्चा असेल. सायंकाळी चार वाजता या मोर्चाची सुरुवात होईल.
पाटील खडकेश्वर मंदिराच्या समोर भाजपने लावलेल्या जल आक्रोश मोर्चाचा बॅनरच्या शेजारीच शिवसेनेने देखील बॅनर लावून प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही पाणीपट्टी अर्ध्यावर आणली, तुम्ही गॅसचे भाव अर्ध्यावर आणणार काय? या आशयाचे बॅनर शिवसेनेच्यावतीने भाजपच्या बॅनरच्या बाजूला लावण्यात आले आहे. शहरात पाण्यावरून राजकारण तापले असतानाच आता याच पाण्यावरून शिवसेना-भाजपमध्ये (Shivsena - BJP) बॅनरबाजी रंगल्याचे दिसून आले आहे.
त्यामुळे आगामी निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्नावरून सर्वच पक्षाकडून राजकारण केलं जाण्याची शक्यता आहे.
कसा आहे मोर्चाचा मार्ग ..
- या मोर्चाला पैठण गेट वरून सुरुवात होईल. त्यानंतर गुलमंडी, औरंगपुरा आणि सरळ खडकेश्वर मंदिरापर्यंत मोर्चा जाईल.
- खडकेश्वर मंदिरापासून मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदान मार्गे महापालिकेकडे मोर्चा जाईल.