देशभरातील सर्वच पक्ष लोकसभा निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. मध्य प्रदेशसाठी भाजपानं उमेदवारांची यादीही जाहीर केल्याचं समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज राजकीय वर्तुळात भूकंप घडवून देणारं मोठं विधान केलं आहे. 2024 पूर्वी भाजपचं काय होणार? एनडीएचं काय होणार? याचा गौप्यस्फोटच राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या विधानावर अनेक राजकीय तर्कवितर्कही लढवले जात आहेत.
संजय राऊत म्हणाले की, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए ही नौटंकी आहे. इंडिया आघाडी निर्माण झाली. त्यानंतर त्यांना एनडीएची आठवण झाली नाही. नंतर इकडून तिकडून लोकं घेतले. बैठक घेतली. शिवसेना आणि अकाली दल नसेल तर एनडीए शून्य आहे. एनडीएची ताकद शिवसेना आणि अकाली दल होती. बाकीचे लोक येतात जातात. एनडीए अस्तित्वातच नाही. ती नौटंकी आहे. एनडीए राहील की नाही माहीत नाही. किंबहूना 2024मध्ये भाजपही फुटलेला असेल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
जेव्हा आम्ही इंडिया म्हणून एकत्र आलो तेव्हा त्यांना जाग आली. तोपर्यंत अकेला मोदी काफी है हेच चालू होतं. इंडिया निर्माण झाल्यावर मोदी अकेला नही उनके साथ और लोक चाहिए ही भावना जागी झाली. आताची एनडीए ही कमकुवत एनडीए आहे. बाकीचे लोक येत जात राहिले. अजून काही लोक भाजपमधून बाहेर पडतील. एवढंच नव्हे तर भाजपही फुटेल, असं राऊत म्हणाले.