नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी |प्रशांत जव्हेरी : जिल्ह्यात भाजपा आमदार राजेश पाडवी (BJP MLA Rajesh Padvi) आणि खासदार डॉ हिना गावित (Dr. Hina Gavit) यांच्यात चांगलीच श्रेयवादाची लढाई जुंपलेली दिसतेय. रस्त्याच्या भुमिपूजनावरून एकाच पक्षातील दोन लोकप्रतिनिधींमधील वाद समोर आला आहे. सोमावल ते नर्मदानगर या रस्त्याचं दोन वेळा भुमिपूजन करण्यात आलं. भाजपातील आमदार आणि खासदार यांच्यातील या वादामुळे भाजपात काही आलबेल सुरू नसल्याचं समोर आलं आहे. भविष्यात नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील भाजपातील ही दुफळी अशीच वाढत जाण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करतात.
नंदुरबार जिल्ह्यातील भाजपचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर आल्याचं दिसंतंय. खासदार गावित आणि आमदार राजेश पाडवी यांच्यातील वादामुळे तळोदा तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. याबद्दल बोलताना राजेश पाडवी यांनी खासदार हिना गावित यांच्यावर आरोप केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून राज्यातील भाजपा आमदारांच्या मतदारसंघात रस्त्यांच्या कामाला मंजुरी देण्यात आली असून आपण केलेल्या पाठपुराव्यामुळे आपल्या मतदारसंघातील सोमावल ते नर्मदा नगर हा पाच कोटी खर्चाचा रस्ता मंजूर झाला. त्यासंदर्भातील पत्रंही आपल्याकडे असून खासदार डॉक्टर हिना गावित पक्षाच्या स्थानिक लोकप्रतिनिधी आणि आमदारांना विश्वासात घेत नाही. अधिकार्यांवर दबाव टाकून परस्पर कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करतात. आम्ही मंजूर केलेल्या कामांचं श्रेय घेत असल्याचा आरोप शहादा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांनी केला आहे.
तर दुसरीकडे हिना गावित यांनीही आमदार राजेश पाडवींवर आरोप केले आहेत. पाडवी यांनी केलेले आरोप डॉ. हिना गावित यांनी फेटाळून लावले असून उलट आपण आपल्या मतदार संघाच्या विकासकामांमध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण करत नाही. आम्ही केलेल्या पाठपुराव्यामुळेच रस्ते मंजूर झाले असून, याचं श्रेय कोणी घेऊ नये. आमदार राजेश पाडवी यांना कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यासाठी माझ्या स्वीय सहायकाने कॉल केला होता, मात्र त्यांनी फोन उचलला नाही. उलट त्यांच्या स्वीय सहाय्यक यांनी शिवराळ आणि अशोभनीय भाषेत बोलल्याचा आरोप खासदार गावित यांनी केला आहे. आपण मतदार संघाच्या विकासात कधीही राजकारण आणणार नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.