लोकसभा निवडणुकीत विजयाची माळ गळ्यात घालण्यासाठी सर्वच पक्षातील नेत्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाने बीड लोकसभेसाठी नुकतीच बजरंग सोनावणे यांना उमेदवारी जाहीर केली. तत्पूर्वी भारतीय जनता पक्षाने पंकजा मुंडे यांना याच मतदारसंघात उमेदवारी घोषित केली आहे. त्यामुळे बजरंग सोनावणे विरुद्ध पंकजा मुंडे असा सामना बीड लोकसभा मतदारसंघात रंगणार आहे. यावर पंकजा मुंडे यांनी मोठी प्रतिक्रिया दिलीय. मुंडे म्हणाल्या, समोरचा उमेदवार कुणीही असो, निवडणूक तितक्याच गांभीर्याने घेतली पाहिजे. विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक लढली जावी, असं मला वाटतं.
पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या, विरोधी उमेदवारांनी त्यांचं काम करावं. मी माझं काम करणार आहे. समोरचा उमेदवार कुणीही असो, निवडणूक तितक्याच गांभीर्याने घेतली पाहिजे. विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक लढली जावी, असं मला वाटतं. ज्योती मेटे यांच्या उमेदवारीबाबतही पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली.
लोकशाहीने त्यांना दिलेला अधिकार आहे. त्यांची भूमिका नेमकी काय आहे? राज्यभर वेगळं जाण्याची की, फक्त बीड जिल्ह्यासाठी आहे? याबाबत जनतेला पटवून सांगणे महत्त्वाचे आहे. मी संपूर्ण प्रचारात विरोधकांवर काही बोलणार नाही. त्यांनी त्यांचं काम करावं आणि मी माझं काम करेल, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.