आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. सर्वच राष्ट्रीय पक्षांची जागावाटपासाठी खलबतं सुरु झाली आहेत. परंतु, भारताचा माजी स्टार खेळाडू गौतम गंभीरने राजकारणाच्या जबाबदारीतून पायउतार होण्याबाबतची पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केली आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. गंभीरने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना टॅग करत राजकारण सोडणार असल्याचं सांगितलं आहे. मला राजकारणाच्या जबाबदारीतून मुक्त करा, अशी विनंती गौतम गंभीरने जे पी नड्डा यांना केली आहे.
राजकारणाच्या जबाबदारीतून बाहेर पडण्यामागचं कारणही गंभीरने या पोस्टद्वारे सांगितलं आहे. गंभीरने ट्वीट करत म्हटलं, राजकारणातून बाहेर पडल्यावर मला भविष्यात क्रिकेटच्या जबाबदाऱ्यांवर लक्ष केंद्रीत करायचं आहे. क्रिकेट संबंधीत असणाऱ्या जबाबदाऱ्या मला पार पाडायच्या आहेत. देशसेवा करण्यासाठी संधी दिल्याबद्दल गंभीरने पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांचे आभारही मानले आहेत.
गौतम गंभीर २२ मार्च २०१९ भारतीय जनता पक्षात सामील झाला होता. भाजपने गंभीरला दिल्ली इस्ट मतदार संघातून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दिली होती. त्यानंतर गंभीरने ६ लाख ९५ हजार १०९ मतांनी या निवडणुकीत विजय मिळवला. त्याने आम आदमी पक्षाच्या उमेदवार प्रत्याशी आणि काँग्रेसचे अरविंद सिंह लवली यांचा पराभव केला होता. महेश गिरी यांच्या जागेवर गंभीरला तिकिट देण्यात आलं होतं.
गौतम गंभीरने २००३ ते २०१६ पर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलं. २००७ ला झालेलाी टी-२० वर्ल्डकप आणि २०११ च्या वनडे वर्ल्डकपमध्ये गौतम गंभीरने भारतीय क्रिकेट संघासाठी उल्लेखनीय कामगिरी केली. २००८ मध्ये गंभीरला अर्जुन पुरस्कार आणि २०१९ मध्ये पद्मश्री पुरस्काराने गंभीरला सन्मानित करण्यात आले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या केंद्रीय निवडणूक कमिटीने लोकसभा निवडणुकीसंदर्भात नुकतीच एक बैठक घेतली होती. जे भाजपात सक्रियपणे काम करत नाहीत, त्या खासदारांना यावेळी तिकिट दिलं जाणार नाही. पंतप्रधान मोदी ४०० प्लसच्या टार्गेटसाठी कोणत्याही प्रकारचा धोका पत्करणार नाहीयत.