राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर उद्धव ठाकरे गटातील अनेक नेते आणि पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. मात्र आता ठाकरे गट या धक्क्यातून सावरताना दिसत आहे. नाशिकमध्ये ठाकरे गटाने भाजपला मोठा धक्का दिला आहे. नाशिक आणि मालेगाव येथील भाजप युवा मोर्चाचे नेते डॉ.अद्वय हिरे यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
अद्वय हिरे यांनी आज उध्दव ठाकरें आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. हिरे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे.
अद्वय हिरे हे नाशिक जिल्ह्यातील भाजपचे महत्त्वाचे नेते असून, ते जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष देखील आहेत. अद्वय हिरे यांनी नुकतीच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर ते आज चार वाजता उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थित शिवसेना भवन येथे ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
दरम्यान नाशिकमध्ये हा ठाकरे गटासाठी मोठा दिलासा मानला जात आहे. कारण यापूर्वी दोनदा शिंदे गटाने नाशिकमध्ये ठाकरे गटाला जोरदार धक्का दिला आहे. ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी हे काही दिवसांपूर्वीच शिंदे गटात सामील झाले आहेत.मात्र आता अद्वय हिरे हे ठाकरे गटात प्रवेश केल्याने भाजपसाठी मोठा धक्का तर ठाकरे गटासाठी दिलासा मानला जात आहे.