Ujjwal Nikam Press Conference : भाजपने मुंबई उत्तर-मध्य लोकसभेसाठी प्रख्यात कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केलीय. त्यामुळे विद्यमान खासदार आणि दोनवेळा या मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या पूनम महाजन यांचा पत्ता कट झाला आहे. काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना याच मतदार संघात लोकसभा उमेदवारी नुकतीच जाहीर केलीय. अशातच उज्ज्वल निकम यांनी पत्रकार परिषदेत मोठी प्रतिक्रिया दिलीय. राजकारणातून समाजहित आणि देशहितही जोपासता येतं, हे येणाऱ्या भविष्यकाळात मी जनतेला दाखवून देईल, असं निकम म्हणाले.
उज्ज्वल निकम पत्रकार परिषदेत म्हणाले, वर्षा गायकवाड अनुभवी राजकारणी आहेत. मी न्यायालयातही प्रतिस्पर्ध्यांना कधीच कमी लेखलं नाही. परंतु, प्रतिस्पर्ध्यांना रोखण्याचं मी निश्चितपणे प्रयत्न केला आहे. हे करत असताना माझ्याकडू चूक होणार नाही. आज संकष्टी आहे. आज गणपतीचा दिवस आहे. म्हणून या दिवशी गणपती बाप्पा माझी बुद्धी चांगली ठेवो, अशी मी प्रार्थना करतो. एक सकारात्मक गोष्ट राजकारणातूनही करता येते. राजकारणातून समाजहित आणि देशहितही जोपासता येतं, हे येणाऱ्या भविष्यकाळात मी जनतेला दाखवून देईल.
दहशतवाद्यांना फासावर चढवणारा योद्धा, असा भाजपने उल्लेख केला आहे, हाच प्रचाराचा प्रमुख मुद्दा असणार आहे का, यावर प्रतिक्रिया देताना निकम म्हणाले, या क्षेत्रात माझ्यापेक्षा जास्त अनुभवी देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार आहेत. प्रचाराचा मुद्दा कोणता असावा, याबाबत ते ठरवतील. पक्षाधिकारी मला जे काम सोपवतील, माझ्या विवेकबुद्धीला अनुसरून ती कामे संसदेत उपस्थित करेन. स्वर्गीय प्रमोद महाजन यांचा खटला चालू असताना पुनम महाजन नेहमी भेटायच्या. त्याचं अभ्यासू व्यक्तीमत्व आहे.
ज्यांनी या मतदारसंघांच दहा वर्षे प्रतिनिधित्व केलं. ते पुन्हा मिळण्याची अपेक्षा करावी, यात गैर काही नाही. या मतदारसंघाचे ज्वलंत प्रश्न कशा पद्धतीने सोडवता येतील, याबाबत त्यांच्याशीही चर्चा करेन. सत्यासाठी आणि न्यायासाठी लढणं, हे माझ्या रक्तात आहे. आजपर्यंतच्या ४०-४५ वर्षांच्या वकीली व्यवसायात मी कोणत्याही आरोपींचं प्रतिनिधीत्व केलं नाही. पण जे खोट्या गुन्ह्यात आरोपी पकडले असतील, त्यांनाही सोडवण्यासी मी धाडसी भूमिका घेतल्या आहेत, असंही निकम म्हणाले.