मुंबई, दिल्ली विमानतळावर लवकरच बायोमेट्रिक सुविधा करण्यात येणार आहे. सध्या प्रवाशांच्या पासपोर्टची व्यक्तिशः केली जाणारी पडताळणी व्यवस्था बंद होईल व प्रवाशांच्या बायोमेट्रिकद्वारे त्यांची पडताळणी करण्यात येणार आहे.
सुरक्षा तपासणीत होणारा विलंब आणि प्रवाशांची गर्दी पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आता लवकरच मुंबई, दिल्ली व बंगळुरू या देशातील प्रमुख शहरांतील विमानतळावर बायोमेट्रिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात ही सुविधा प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी कार्यान्वित करण्यात येणार आहे. प्रवाशाच्या चेहऱ्याची किंवा बोटांच्या ठशांची पडताळणी बायोमेट्रिक मशीनद्वारे केली जाईल व प्रवाशाला इमिग्रेशन येथून पुढील प्रवासासाठी प्रवेश दिला जाईल.