ताज्या बातम्या

'ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशन'च्या संशोधकांना मोठे यश; सापसुरळीच्या पाच नवीन प्रजातींचा शोध

'ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशन'च्या संशोधकांना पिल्लाला जन्म देणार्‍या सापसुरळ्यांच्या नव्या कुळाचा (genus) आणि पाच नव्या प्रजातींचा (species) शोध लावण्यात यश आलेले आहे.

Published by : Team Lokshahi

'ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशन'च्या संशोधकांना पिल्लाला जन्म देणार्‍या सापसुरळ्यांच्या नव्या कुळाचा (genus) आणि पाच नव्या प्रजातींचा (species) शोध लावण्यात यश आलेले आहे. पिल्लाला जन्म देणार्‍या सापसुरळीची ही भारतीय द्वीपकल्पामधील पहिलीच नोंद आहे. या संशोधनामधे ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनचे संशोधक ईशान अगरवाल, तेजस ठाकरे आणि अक्षय खांडेकर यांचा सहभाग आहे. जर्मनीमधून प्रकाशीत होणार्‍या 'व्हर्टिब्रेट्स झूलॉजी' या अंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकातून या संशोधनावरती शिक्कामोर्तब झाले आहे.

नव्याने शोधलेल्या कुळाला 'द्रविडोसेप्स' असे नाव देण्यात आले आहे. 'द्रविड' या संस्कृत आणि 'सेप्स' या ग्रीक शब्दांवरुन हे नामकरण केले आहे. दक्षिण भारतातील आढळक्षेत्रासाठी 'द्रविड' आणि सापसदृश्य ठेवणीसाठी 'सेप्स' यांच्या जोडणीतून कुळाचे नाव योजिले आहे. अंड्यांऐवजी पिल्लांना जन्म देणे, डोळ्यांवरील खालच्या पापणीचे पारदर्शक असणे आणि जनुकीय संच्याच्या वेगळेपणावरुन द्रविडोसेप्स हे कुळ सबडोल्युसेप्स या कुळापासून वेगळे केले आहे. नव्याने शोधलेल्या पाचही प्रजाती या तामिळनाडू राज्यातील आहेत. द्रविडोसेप्स जिंजीएन्सीस, द्रविडोसेप्स जवाधूएन्सीस, द्रविडोसेप्स कलक्कडएन्सीस, द्रविडोसेप्स श्रीविल्लीपुथुरेन्सीस आणि द्रविडोसेप्स तामिळनाडूएन्सीस या पाचही प्रजातींचे नामकरण त्यांच्या आढळक्षेत्रावरुन करण्यात आलेले आहे.

रायोपा गोवाएन्सीस, सबडोल्युसेप्स पृदी आणि सबडोल्युसेप्स निलगीरीएन्सीस या तीन प्रजातींचे वर्गीकरणातील स्थान बदलून नव्याने शोधलेल्या कुळामधे निश्चित करण्यात आलेले आहे. नव्या कुळात समाविष्ट केलेली द्रविडोसेप्स गोवाएन्सीस ही प्रजात उत्तर गोव्यातील उत्सुम तसेच महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग (अंबोली) आणि कोल्हापूर जिल्ह्यातून नोंदवली गेली आहे. कोल्हापूर जिल्हातील तिचा आढळ राधानगरी, पंडिवरे (भुदरगड), तळये (गगनबावडा) आणि वाशी (पन्हाळा) या ठिकाणांवरुन नोंदवला गेला आहे. सदरच्या संशोधनामधे सापसुरळ्यांचे ३३ ठिकाणांवरुन ८९ नमुने गोळा करण्यात आहे. तामिळनाडू, गोवा आणि महाराष्ट्रात या राज्यांमधे पाच वर्षे सुरु असलेल्या संशोधन मोहीमांच्या शेवटी संशोधकांना नविन कुळ आणि पाच नविन प्रजातींचा शोध लावण्यात यश आलेले आहे. या संशोधनामधे सापसुरळ्यांची शरीरवैशिष्ट्ये, जनुकीय संच, भौगोलिक आढळक्षेत्र आणि या आढळक्षेत्राचा भौगोलिक इतिहास तसेच या प्रजातींच्या उत्क्रांतीचा कालखंड यांचा अभ्यास करण्यात आला.

सरीसृपांमधे पिल्लांना जन्म देण्याचे समयोजन हे कमी तापमानाच्या अधिवासाशी जोडलेले आहे. कमी तापमानामधे अंडी उबवण्याच्या अडचणींवरील उपाय म्हणून थेट पिल्लांनाच जन्म देण्याचे समयोजन उत्क्रांत झाले असावे असा मतप्रवाह आहे. पण पिल्लांना जन्म घालणार्‍या सरीसृपांच्या सर्वाधिक प्रजाती या उष्ण कटिबंधीय प्रदेशामधून नोंदवलेल्या आहेत. भारतामधे सापसुरळ्यांच्या चाळीसहून अधिक प्रजातींची नोंद आहे. यातील भारतीय द्वीपकल्पासाठी पिल्लाला जन्म देणार्‍या सापसुरळीची ही पहीलीच नोंद आहे.

ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशन सरीसृपांसारख्या दुर्लक्षित जीवांच्या संशोधनासाठी आणि संवर्धनासाठी अविरत प्रयत्न करत आहे. सरीसृपांच्या चाळीसहून अधिक नव्या प्रजातींचा शोध लावण्यास फाउंडेशनच्या संशोधकांना यश आलेले आहे. पिल्लांना जन्म देणार्‍या सापसुरळ्यांवरती प्रकाशित झालेले सदरचे संशोधन या दुर्लक्षित जीवांविषयी कुतुहल वाढवणारे आहे. यातील प्रजातींचे प्रदेशनिष्ठ असणे हे त्यांच्या अधिवासाच्या संवर्धनाचे महत्व अधोरेखित करणारे आहे.

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Black circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result

Sanjay Raut :इतिहास चंद्रचुड नायडूंना माफ नाही करणार | Maharashtra Vidhansabha Result