दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. दुधाला अनुदान देण्यासंदर्भात मंत्रीमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दुधासाठी सरकार 5 रुपयांचं अनुदान देणार आहे. त्यामुळे पाच रुपयांच्या सबसिडीसह दूध उत्पादक शेतकऱ्यांना 32 रुपयांचा दर मिळणार आहे. हा दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा म्हणावा लागेल. 32 रुपयाचा दर ठरल्यास दूध संघांना शेतकऱ्यांना 27 रुपये प्रति लिटर दर द्यावा लागणार आहे.
आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील 72 टक्के दूध खासगी संस्थांना दिले जाते आणि सरकारनं दिलेल अनुदान फक्त सहकाराला आहे. त्यामुळे बहुतांश दूध उत्पादक शेतकरी वंचित राहणार आहेत. त्यामुळं सरकारनं सर्वांना अनुदान द्यावं, अशी मागणी किसान सभेनं केली होती.
दरम्यान, डीबीटी करण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते हे त्याच्या आधार कार्डशी आणि पशुधनाच्या आधारकार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. त्याची पडताळणी करणं आवश्यक राहील. ही योजना दिनांक 1 जानेवारी 2024 ते दिनांक 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीसाठी लागु राहणार आहे. त्यानंतर आवश्यकतेनुसार आढावा घेवून मुदतवाढ देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.