अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राअध्यक्ष जो बायडेन हे राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. 81 वर्षीय अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांच्या मानसिक आरोग्याचा संदर्भ देत, त्यांच्या उमेदवारीबद्दल रिपब्लिकन कॅम्पमधून प्रश्न उपस्थित केले जात होते. डेमोक्रॅटिकचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार बायडेन यांनी मतदानाच्या 106 दिवस आधीच मैदान सोडले. शिवाय त्यांनी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचे नाव अध्यक्षपदासाठी पुढे करून त्यांना पाठिंबा दिला आहे. डेमोक्रॅट पक्षाच्या प्रबळ दावेदार कमला या अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणाऱ्या पहिल्या भारतवंशीय असतील.
बायडेन यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्यात म्हणाले की, माझ्या सहकारी डेमोक्रॅटांनो, मी नामांकन न स्वीकारण्याचा आणि माझ्या उर्वरित कार्यकाळासाठी अध्यक्ष म्हणून माझी सर्व शक्ती माझ्या कर्तव्यांवर केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. 2020 मध्ये पक्षाचे उमेदवार म्हणून माझा पहिला निर्णय म्हणजे कमला हॅरिसची उपाध्यक्षपदी निवड करण्याचा होता आणि मी घेतलेला हा सर्वोत्तम निर्णय आहे. आज मी कमला यांना या वर्षी आमच्या पक्षाची उमेदवारी देण्यासाठी माझा पूर्ण पाठिंबा आणि समर्थन देऊ इच्छितो. डेमोक्रॅट्स - एकत्र येण्याची आणि ट्रम्पला पराभूत करण्याची वेळ आली आहे. चल हे करूया.
27 जून रोजी डिबेटमध्ये बायडेन यांच्या पराभवानंतर अमेरिकी राजकारणात उलथापालथ सुरू झाली. डेमोक्रॅटिक कॅम्पमध्ये बायडेन यांच्या उमेदवारी विरोधात मोर्चेबांधणी सुरू झाली. याचा परिणाम रविवार रात्री बायडेन शर्यतीतून बाहेर पडल्याच्या घोषणेने झाला.