मुंबई | अभिजित हिरे : मुस्लीम धर्मीयांचा पवित्र रमजान (Ramzan) महिना अर्थातच उपवासाचा महिना असतो. या पवित्र रमजान महिन्यात रोजे अर्थात उपवास केले जातात. मागील दोन वर्ष रमजान महिन्यात घरातच रोजा इफ्तार करून उपवास सोडावा लागत होता. सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्याला मनाई होती. परंतु यंदा प्रथमच कोरोना (Covid19) काळात लावण्यात आलेले सर्व निर्बंध उठविण्यात आल्यानंतर रमजान साजरा होतोय. यावेळी भिवंडीत पोलिसांनी इफ्तार (Bhiwandi Police) पार्टीचं आयोजन करत सामाजिक सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
रमजान महिन्यात मुस्लिम समुदायात उत्साह द्विगुणित झालेला आहे. दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या इफ्तार पार्टी पुन्हा एकदा आयोजित करण्यास सुरुवात झाली आहे. नुकताच शांतीनगर पोलीस ठाणे येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण, उपमहापौर इमरान खान यांच्या प्रमुख उपस्थितीत इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात सर्वधर्मीय राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक व सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.