नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून भारतरत्न पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्यात येणार आहे. त्यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात येणार आहे. कर्पूरी ठाकूर यांची 100 वी जयंतीनिमित्त आज सरकारने ही घोषणा केली आहे.
कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. मंगळवारी (२२ जानेवारी) जेडीयू नेते केसी त्यागी यांनी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची तसेच त्यांच्या नावाने विद्यापीठ सुरू करण्याची मागणी केली होती. यानंतर आज कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, दलितांच्या उन्नतीसाठी त्यांची अटल वचनबद्धता आणि त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने भारताच्या सामाजिक-राजकीय जडणघडणीवर अमिट छाप सोडली आहे. हा पुरस्कार केवळ त्यांच्या उल्लेखनीय योगदानाचा गौरव करत नाही तर अधिक न्याय्य आणि न्याय्य समाज निर्माण करण्याचे त्यांचे ध्येय पुढे चालू ठेवण्यासाठी आम्हाला प्रेरणा देतो, असे त्यांनी ट्विटरवर म्हंटले आहे.
कोण आहेत कर्पूरी ठाकूर?
कर्पूरी ठाकूर यांना बिहारमध्ये जननायक म्हणतात. कर्पूरी ठाकूर हे दोनदा बिहारचे मुख्यमंत्री झाले होते. त्यांची स्वातंत्र्य सेनानी म्हणून ओळख होती. तसेच, भारत छोडो आंदोलनात त्यांनी तुरुंगवासही भोगला होता. कर्पूरी ठाकूर हे हिंदी भाषेचे समर्थक होते आणि बिहारचे शिक्षणमंत्री या नात्याने त्यांनी मॅट्रिकच्या अभ्यासक्रमातून इंग्रजी हा अनिवार्य विषय काढून टाकला. 1970 मध्ये बिहारचे पहिले बिगर-काँग्रेस समाजवादी मुख्यमंत्री बनण्यापूर्वी त्यांनी बिहारचे मंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून काम केले. बिहारमध्येही त्यांनी संपूर्ण दारूबंदी लागू केली होती. कर्पूरी ठाकूर हे 1952 पासून सतत आमदार होते, पण त्यांनी स्वतःसाठी घरही बांधले नाही. मुख्यमंत्री असतानाही कर्पूरी ठाकूर रिक्षानेच प्रवास करायचे.