बीडच्या सावरगावात पंकजा मुंडे यांचा आज दसरा मेळावा असणार आहे. दसरा मेळाव्यासाठी कार्यकर्त्यांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. यंदा पहिल्यांदाच बीड जिल्ह्यात दोन दसरा मिळावे होत असल्याने विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचा यंदाचा दसरा मेळावा विशेष असणार आहे. कारण पहिल्यांदाच दसरा मेळाव्यानिमित्त मुंडे बहिण भाऊ एकाच व्यासपीठावर उपस्थित असणार आहेत. कृषी मंत्री धनंजय मुंडे हे पंकजा मुंडे यांच्या सावरगाव घाट येथील दसरा मेळाव्याला विशेष उपस्थिती लावणार आहेत.
मुंडे यांनी त्यांच्या समर्थकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन देखील केलंय. पहिल्यांदाच दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर मुंडे बहीण भाऊ एकत्र येणार असल्याने त्यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पंकजा मुंडेंच्या व्यासपीठ परिसरात विशेष 15 सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. यासोबतच 200हून अधिक पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे.