उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यात बोट बुडाल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. जिल्ह्यातील मार्का पोलीस ठाण्याच्या हद्दीत यमुना नदीच्या मध्यभागी एक बोट बुडाली. या बोटीत 30 हून अधिक लोक होते. अपघातानंतर 4 जण पोहून बाहेर आले. बोट आणि बाकीचे लोक अद्यापर्यंत सापडलेले नाहीत. शोधासाठी प्रशासकीय यंत्रणांनी ऑपरेशन सुरू केलं आहे. बचावलेल्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार बोटीत 40 लोक होते. त्यामुळे बचावलेल्या चार जणांना वगळता बाकी लोक बुडाल्याची शक्यता आहे.
स्थानिक गोताखोरांसह एसडीआरएफच्या पथकाकडून बुडालेल्या लोकांच्या शोधासाठी शोधकार्य सुरु करण्यात आलं आहे. यातील दोन जणांचे मृतदेह सापडले आहेत. रक्षाबंधनाच्या निमित्ताने बोटीवर महिला आणि लहान मुलंही मोठ्या संख्येनं असल्याचं सांगण्यात येतंय. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या गंभीर अपघाताची दखल घेतली आहे. योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवलं आहे.
मार्कापासून फतेहपूर, प्रयागराजपर्यंत लोक यमुना नदी पार करण्यासाठी बोटीचा वापर करत असतात. कारण याठिकाणी नदी पार करण्याचं एकमेव साधन म्हणजे बोट आहे. या बोटींमधून 30 ते 40 स्वार नदीच्या एका काठावरून दुसऱ्या बाजूला नेले जातात. गुरुवारी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास 30 हून अधिक जण मार्कावरून बोटीने फतेहपूरकडे जात होते. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे बोट मध्यभागी आल्यानंतर अनियंत्रित झाली आणि उलटली.
अपघातात बोटीवरील सर्वजण बुडाल्याची माहिती आहे. 28 वर्षीय राजकरण पासवान हा स्थानिक तरुण, 60 वर्षीय गया प्रसाद निषाद, समगारा बाबेरू हे नदीतून बाहेर पडण्यात यशस्वी झाले. दुपारी 4 वाजेपर्यंत 30 वर्षीय माया, 26 वर्षीय पिंटू, सहा वर्षांचा महेश, तीन वर्षांची संगीता, 15 वर्षांचा जयेंद्र मुलगा प्रेमचंद्र, 15 वर्षीय करणचा मुलगा रिज्जू, सात वर्षीय ऐश कुमार, 48 वर्षीय फुलवा आणि 50 वर्षीय मुन्ना यांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.