ओबीसी प्रवर्गासाठी (OBC category) महत्त्वाचा मुद्दा असलेला जातनिहाय जनगणना ( Caste wise census) आणि खासगी उद्योगांमधील आरक्षणाच्या मागणीसाठी ऑल इंडिया बॅकवर्ड अँड मायनोरिटी कम्युनिटीज एम्पॉलाइज फेडरेशनच्यावतीनं उद्या (24 मे) भारत बंदचे आवाहन करण्यात आलं आहे.
भारत बंद का पुकारला?
निवडणुकीत ईव्हीएमचा वापर करु नये, जातनिहाय जनगणना करण्यात यावी, खासगी क्षेत्रात एसी, एसटी आणि ओबीसींसाठी आरक्षण, शेतकऱ्यांना एमएसपी देण्यात यावी, एनआरसी, सीएए आणि एनपीआर लागू करु नये, जुनी पेन्शन योजना लागू करावी, ओबीसींसाठी स्वतंत्र मतदारसंघ, आदिवासींना संरक्षण, करोना प्रतिबंधक लस वैकल्पिक करणे, कामगार कायद्यांतील बदलांना विरोध या मुद्यांसाठी भारत बंदची हाक देण्यात आली आहे.
बामसेफचे अध्यक्ष वामन मेश्राम यांनी नॅशनल बॅकवर्ड क्लासेस फ्रंटच्यावतीनं भारत बंदचं आवाहन करण्यात आल्याचं सांगितलं आहे. नॅशनल परिवर्तन मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा आणि इतर संघटनांकडून भारत बंदला पाठिंबा देण्यात आल्याचं वामन मेश्राम यांनी सांगितलं आहे. भारत बंदमध्ये ओबीसी समुदायानं सहभागी होऊ नये म्हणून प्रयत्न करण्यात येत असल्याचं देखील वामन मेश्राम म्हणाले.