महाराष्ट्राच्या विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. याच पार्श्वभूमीवर आता बाळासाहेब थोरात यांनी ट्विट करत म्हटले आहे की, मागील वर्ष हे दुष्काळाचे व पाणीटंचाईचे असतानाही शेतकऱ्यांनी अतोनात कष्ट करून पिके आणली. मात्र जानेवारीमध्ये झालेल्या वादळी वाऱ्यामुळे फळबागा व या बारमाही पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
आता जुलै महिना उजाडला आहे. शेतकऱ्यांच्या फळबागा पिकांचे व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले असून सहा महिने होऊनही अद्याप सरकारकडून कोणतीही मदत मिळाली नाही. हे दुर्दैवी आहे. याचाच अर्थ सरकारला शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाबद्दल काहीही देणेघेणे नाही.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, रब्बी हंगामात नुकसान झाले, आता खरीप हंगाम सुरू आहे. शेतकऱ्यांना पुन्हा पिकाची उभारणी करायची आहे, त्यांच्यासमोर अनेक अडचणी आहे, अतिवृष्टी व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानाची मदत त्वरित मिळणे गरजेचे आहे, मात्र या मदतीला फारच विलंब झाला आहे. हे चुकीचे असून या अधिवेशनात याबाबत तातडीने निर्णय झाला पाहिजे अशी मागणी विधानसभेत केली. असे बाळासाहेब थोरात म्हणाले.