आदेश वाकळे, संगमनेर
शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून महाविकास आघाडीने घेतलेले निर्णय बदलण्याचे काम केल्याचे दिसून येते. जनतेतून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय विद्यमान सरकारने घेतला पण तो घेण्याआधी त्याचे फलित काय? हे तपासणे आवश्यक होते. हा निर्णय जेव्हा पूर्वी झाला तेव्हा नगरपालिका किंवा ग्रामपंचायत व्यवस्थित चालते आहे का? हे जर त्यांनी तपासले असते तर हा निर्णय घेताना त्यांनी चारदा विचार केला असता, असे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.संगमनेर येथे पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयाचा समाचार घेतल आहे.
पेट्रोलवरचे दर कमी केले हे जरी खरं असलं तरी दुसऱ्या बाजूने विजेचे दर मात्र 20 टक्क्याने वाढवले आणि हे सांगायला ते जाणीवपूर्वक विसरले. एका बाजूने दिलासा द्यायचा आणि दुसऱ्या बाजूने जाणीवपूर्वक लोकांच्या खिशातून पैसा काढून घ्यायचा असा हा सगळा प्रकार दिसतो. मंत्रिमंडळ विस्तार गेल्या पंधरा दिवसापासून रखडलेले आहे आपआपसात वाद आहेत आणि त्यामुळे हा मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला आहे त्यामुळे अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत. मुख्यमंत्री गडचिरोलीला गेले मात्र संपूर्ण महाराष्ट्रात पूरस्थिती मध्ये जवळपास ९० पर्यंत बळी गेलेले आहेत.
या सगळ्या परिस्थितीचा आढावा दुर्दैवाने या नव्या सरकारने घेतलेला दिसत नाही, कुठेही त्याबाबतीत जागृत दिसत नाही. शेतकऱ्यांना पन्नास हजार रूपये अनुदान देण्याता निर्णय आम्हीच घेतलेला होता, त्याची अंमलबजावणी १ जुलैपासून सुरू झाली होती. लोकशाही धोक्यामध्ये आहे. ही लोकशाही वाचवण्याची लढाई आहे आणि आम्ही ही लढाई एकत्रित लढत होतो, असेही बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.