माजी मंत्री आणि प्रहार पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू दिवसेंदिवस मंत्रिमंडळ विस्तारावरुन नाराज होताना दिसत आहेत. जेव्हा सरकार स्थापन झालं त्यावेळी मंत्री पद मिळालं नाही म्हणून जाहीर नाराजी बोलून दाखवली होती. मात्र अजून ही त्यांना सरकारमध्ये मंत्री पदाची संधी दिली नाही. त्यावरच मंत्रिमंडळ विस्तार होणार नसेल तर स्पष्ट सांगा, असं आवाहन बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलं आहे.
काय म्हणाले बच्चू कडू?
आम्हालाही असं वाटतंय की, एकतर विस्तार करु नका. डायरेक्ट सांगून द्या की, विस्तार होत नाही. सगळे शांततेने सरकारसोबत राहतील. ते काय म्हणतात? फुल काढायचं, पुन्हा खिशात ठेवायचं, काय टेक्निकल बाबी असतील ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगाव्यात. या अडचणी आहेत, यामुळे विस्तार होऊ शकत नाही, असं बच्चू कडू म्हणाले.
सगळे 60 आमदार कुणीही काय बोलणार नाही. एकतर करा, नाही होत असेल तर स्पष्ट सांगा. कारण बऱ्याच आमदारांमध्ये कुजबूज चालू आहे असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं. माझे दोन आमदार आहेत. दोन आमदाराच्या माणसाला मंत्रिमंडळ ठरवण्याचा अधिकार नाहीय. पण येस किंवा नो ते सांगून टाकलं पाहिजे. असं वृत्ताशीं बोलताना म्हणाले.
फडणवीस म्हणत होते अधिवेशनाच्या आधी मंत्रीमंडळ विस्तार करू. नंतर अधिवेशन झालं. त्यात तांत्रिक अडचण असू शकते. आमची काय त्याबद्दल नाराजी नाही. पण माझं म्हणणं आहे की स्पष्टपणे सांगून टाकायला हवं. प्रमुख लोकांनी हे स्पष्टपणे सांगायला हवं. त्याबाबतचा जनतेमधला संभ्रम दूर करायला हवा”, असंही बच्चू कडू म्हणाले.