27 फेब्रुवारीपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर होणारं हे पहिलंच अधिवेशन असून यावेळी विरोधक शिंदे सरकारची कोंडी करण्याच्या प्रयत्नात असेल. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस 9 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहे. मात्र ठाकरे गट वगळता महाविकास आघाडीतील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावा शिंदे गटातील आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
काय म्हणाले बच्चू कडू?
२० ते २५ आमदार जरी इकडे तिकडे झाले, तरी सरकार मजबुतीने राहील आणि सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल. महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाचे किती आमदार फुटतील, हे सध्याच सांगणे शक्य नाही. पण १० ते १२ आमदार फुटणार, हे मात्र नक्की.
येत्या १० ते १५ दिवसांत आणि अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या अगोदर ही घडामोड होणार आहे. ठाकरे गटातील आमदार फुटण्याचा प्रश्नच राहिलेला नाही. कारण तेथून जे निघायचे होते, ते आधीच निघालेले आहेत, असेही ते म्हणाले.
आदित्य ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान दिले आहे. हे आव्हान देणे आता पोचट झाले आहे. अशा आव्हान देण्याला काही अर्थ नाही. आदित्य ठाकरेंचा हा बालिशपणा आहे. जेव्हा विधानसभेची निवडणूक होईल, तेव्हा आव्हान दिले पाहिजे. आता केवळ बडबड करण्यात काही अर्थ नाही, असही बच्चू कडू यावेळेस म्हणाले आहेत.