आगामी होणाऱ्या लोकसभेसाठी प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी अमरावतीत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. प्रहारचे उमेदवार दिनेश बूब यांच्या नामांकनासाठी प्रहारने रॅली काढली होती. यावेळी बच्चू कडू यांनी मोदी सरकारवर टीका केली. "श्रीमंताच्या विरोधात ही लढाई आहे. एकाच घरात खासदार, आमदार नवरा-बायको आहे. आम्ही फक्त मत मागायचे का? जेव्हा निकाल जाहीर होईल, तेव्हा देशातले नेते पाहत राहतील. आमचा प्रहार पक्ष स्वतंत्र आहे. जास्त बोललात तर जेलमध्ये टाकू, अशी चिठ्ठी आली होती. तुम्ही जेलमध्ये टाकलं तरी जेलमधून बोलत राहणार, असं म्हणत कडू यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
कडू पुढे म्हणाले, आम्ही सर्वसामान्य माणसाचे गुलाम आहेत. बच्चू कडू कार्यकर्त्यांचा नेता आहे. दुपट्टा घातला आणि नेता झाला अशी परिस्थिती नाही. रामदेव बाबाने उद्योग सुरु केले, पण बचत गटाचं काय? हेच मोदींचे अच्छे दिन आहेत का? असा सवालही बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे. मेळघाटमध्ये साड्या वाटता, तिथं पाण्याची गरज आहे. रोजगाराची गरज आहे. या जिल्ह्याची प्रतिमा कुणी खराब करत असेल, तर आम्ही सोडणार नाही. जातप्रमाणपत्रात सांगितलं आहे की, हा गुन्हा आहे. पण अजून निकाल नाही. म्हणून राणा आता जनतेच्या न्यायालयात आहे. नेते मॅनेज झाले पण भाजपचे स्वाभिमानी कार्यकर्ते राणाला मत देणार नाही.
आम्ही आगीत उडी टाकली आहे. सत्तेतील लोक आम्हाला जेलची पायरी चढायला लावणार आहेत, हे आम्हाला माहित आहे. पाच हजार मतांनी माझा लोकसभेत पराभव झाला होता. आता ते दिनेश बूब यांच्या माध्यमातून पूर्ण करायचं आहे. महाराष्ट्राचं राजकारण अमरावती ठरवेल. सरकार विचित्र धोरण घेऊन कापूस सोयाबीनचे भाव पाडत आहे. मी विधानसभेत आवाज उठवतो, तसच दिनेश बूब लोकसभेक आवाज उठवणार आहे. एका उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही, असं टोला कडू यांनी राणांना लगावला.