बदलते युग आणि स्मार्टफोनची आवक यामुळे लोकांमध्ये सेल्फी काढण्याची क्रेझ वाढली आहे. आता प्रत्येक व्यक्ती सेल्फी घेऊन आपल्या दैनंदिन जीवनातील विविध आठवणी जपून ठेवतोय. इतकंच नव्हे तर बहुतेक तरुण आपल्या सोशल मीडियावर सेल्फी अपडेट करत असतात. या सेल्फी काढण्याच्या शर्यतीत लोकांना काय करावे हेच कळत नाही. कधी कधी जीवाचाही धोका पत्करतात. तुम्हालाही असाच छंद असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण भारतीय रेल्वेच्या नियमानुसार रेल्वे ट्रॅक किंवा फलाटाच्या बाजूला सेल्फी घेतल्यास एक हजार रुपये दंड आकारला जातो. यासोबतच सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते. या तरतुदींबद्दल जाणून घेऊयात सविस्तरपणे...
रेल्वे स्टेशन आणि रेल्वे ट्रॅक परिसरात रेल्वे कायदा 1989 लागू आहे.
रेल्वे कायदा 1989 भारतातील प्रत्येक रेल्वे स्थानकाला आणि रेल्वेसाठी टाकलेल्या ट्रॅकच्या क्षेत्राला लागू होतो. रेल्वे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना विविध प्रकारच्या दंड आणि शिक्षेची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे. रेल्वे कायदा 1989 च्या कलम 145 आणि 147 मध्ये जीव धोक्यात घालून सेल्फी काढणाऱ्यांना शिक्षेची तरतूद आहे. रेल्वे ट्रॅक किंवा प्लॅटफॉर्मच्या बाजूला सेल्फी काढणे हा दंडनीय गुन्हा आहे. सेल्फी घेताना पकडल्यास आरोपीला एक हजार रुपयांचा दंड ठोठावला जातो. तर दंडासह सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते.
रेल्वे मंत्रालय आणि भारतीय रेल्वे सतत आवाहन करत आहेत.
रेल्वे मंत्रालय आणि भारतीय रेल्वे प्रवाशांना रेल्वे ट्रॅक आणि प्लॅटफॉर्मच्या बाजूला सेल्फी न घेण्याचे आवाहन करत आहेत. त्यासाठी जाहिरातीही दिल्या जातात. सोशल मीडियाच्या मदतीने लोकांना असे न करण्याचा सल्लाही दिला जातो. भारतीय रेल्वे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे की असे सेल्फी घेतल्याने जीव धोक्यात येतो. म्हणूनच जीव धोक्यात घालून सेल्फी घेण्याचा प्रयत्न करू नका. असं केल्याचं निदर्शनास आल्यास दंड आणि तुरुंगवास देखील होऊ शकतो.