Chitra Wagh Tweet : राज्य सरकारने औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव धाराशिव करण्याचा निर्णय घेतला होता. या नामांतराने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण झाल्याचं महायुती सरकारनं म्हटलं होतं. परंतु, विरोधकांनी महायुती सरकारच्या या निर्णयावर टीकास्त्र सोडलं होतं. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी विरोधकांना धारेवर धरलं आहे. "या निर्णयाच्या विरोधात काही नतद्रष्टांनी आणि शिवरायांना न मानणाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण आता, या नामांतर विरोधी याचिकेवर हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात नकार दिला आहे", असं म्हणत वाघ यांनी विरोधकांवर ट्वीटरच्या माध्यमातून हल्लाबोल केला आहे.
चित्रा वाघ ट्वीटरवर काय म्हणाल्या?
शिवरायांच्या विरोधकांचं थोबाड रंगलं !
औरंगाबादचं नाव श्री छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव धाराशिव करण्याचा 'महायुती' सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला होता. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर नागरिकांनी अभिनंदनचा अक्षरशः वर्षाव केला होता. वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न 'महायुती' सरकारने पूर्ण केले. त्याला केंद्रातील आदरणीय मोदीजी यांच्या सरकारनेही त्वरित अनुमती दिली, ही वस्तुस्थिती अगदी ताजी आहे.
या निर्णयाच्या विरोधात काही नतद्रष्टांनी आणि शिवरायांना न मानणाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण आता, या नामांतर विरोधी याचिकेवर हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात नकार दिला आहे.'हात दाखवून अवलक्षण' म्हणतात ते यालाच ! अहमदनगरचे नाव श्री अहिल्यानगर करण्याचा निर्णय देखील महायुती सरकारने घेतला आहे. पण, खासदार निलेश लंके यांनी त्याला पूर्ण विरोध दर्शविला आहे.
पाहू या पुढे काय होते ते ! जनतेच्या भावना सांभाळणारे आणि जनतेच्या हिताचे निर्णय घेणारे हे 'महायुती चे सरकार असून सरकारला काम करू न देणारे विरोधक असेच वेळोवेळी तोंडावर आपटतात आणि थोबाड रंगवून घेतात, हे वेगळे सांगायला नको !