सांगलीतील उपजिल्हाधिकारी (Sangali Collector Assault) महिला अधिकाऱ्यावर हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अज्ञाताने चाकूने हल्ला करत उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम यांना जखमी केले आहे. पहाटे जॉगिंगसाठी गेले असता हा प्राणघातक हल्ला केला आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
गेडाम या सकाळी नेहमीप्रमाणे जॉगिंगसाठी विश्रामबागच्या नेमिनाथनगर येथील कल्पद्रुम क्रीडांगणावर गेल्या होत्या. जॉगिंग सुरू असताना मोटारसायकालवरून आलेल्या अज्ञात दोघांनी छेडखाणी करत उपजिल्हाधिकारी यांच्या दंडाला हात लावून ओढत "चालतेस का"? असं विचारले. हात लावणाऱ्या अज्ञाताला गेडाम यांनी लाथ मारून खाली पाडले. या झटापटीत दुसऱ्या अज्ञात व्यक्तीने चाकूने गेडाम यांच्यावर हल्ला केला. यामध्ये गेडाम यांच्या हाताला जखम झाली आहे. यातील एकाने 17 मे रोजी गेडाम यांचा पाठलाग करत छेडखानी करण्याचा प्रकार केला होता. आज तीच व्यक्ती पहाटेच्या सुमारास पुन्हा आली, आणि त्याने गेडाम यांच्यावर हल्ला केला आहे.