मागील दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने पुण्याला झोडपून काढले आहे. अशात पुण्यासह धरण परिसरात मागील चोवीस तासांपासून सतत पाऊस सुरू आहे. धरण परिसरातील या सततच्या पावसामुळे खडकवासला, मुळशी आणि भुशी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरू लागले आहे.
सिंहगड रोड येथील रेस्क्यू ऑपरेशनत आर्मी ही मैदानात दाखल झाली आहे. आर्मीचे जवानही रेस्क्यू ऑपरेशन मध्ये सहभागी झाले आहेत. इमारतीमध्ये अडकलेल्या नागरिकांना आर्मीचे जवान रेस्क्यू करत आहेत. एकता नगर परिसरातील 5-6 सोसायट्यांमध्ये पाणीच पाणी झाले आहे. येथे अडकलेल्या 200 हून अधिक नागरिकांची आतापर्यंत सुटका करण्यात आली आहे. अधिकच्या बचाव कार्यासाठी एनडीआरएफची पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत.
मुळशी परिसरात जोरदार पाऊस होत असल्याने मुळशी धरण जलाशय सकाळी सात वाजेपर्यंत 70 टक्के क्षमेतेने भरलेले होते. त्यामुळे आज दोन वाजता धरणाच्या सांडव्यावरून 2500 क्युसेक विसर्ग सोडण्यात येणार आहे. नदी पात्रात पाऊस वाढत राहिल्यास परिस्थितीनुसार विसर्ग कमी-जास्त करण्यात येईल. याबाबतची माहिती धरण प्रशासनाने दिली आहे.