मी खूप निवडणूक लढलोय, खूप निवडणुका जिंकलोय, खूप निवडणूक हारलोय, तर काही निवडणुका जिंकता जिंकता हारलोय, काही हारता हारता जिंकलोय. त्यामुळे निवडणुकीत एका एका मताचं महत्त्व माझ्या एव्हढं कुणालाच माहित नाही. कारण या देशात जे लोक एक मताने हरलेत, असे तीन लोक आहेत आणि त्या तीन लोकांमध्ये मी एक आहे. राम प्रधान, विलासराव देशमुख आणि अनिल परब, हे तीन लोक एक मताने हरलेले लोक आहे. राम प्रधान राज्यसभेत हरले. मी आणि विलासराव देशमुख विधानपरिषेदत हरलो. त्यामुळे एका एका मताचं महत्व काय आहे, ते मला माहित आहे, असं शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि मुंबई पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अनिल परब यांनी पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या ठाकरे गटाच्या बैठकीत कार्यकर्त्यांना संबोधीत करताना म्हटलं.
अनिल परब पुढे म्हणाले, आतापर्यंतचा इतिहासा असा आहे की, शिवसेनेचा जो विजयीरथ चर्चगेटला पोहोचला आहे, तो या विभागाने पुढच्या विभागापर्यंत यशस्वीपणे सुपूर्द केला आहे. पदवीधर मतदारसंघाचीही तीच परिस्थिती आहे. गेले पाच टर्म म्हणजे ३० वर्ष हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहे. त्यामुळे या मतदारसंघाची रचना, या मतदारसंघाचा अभ्यास आणि हा मतदारसंघ कसा जिंकायचा, हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. निवडणूक ही निवडणूक असते. प्रत्येक निवडणूक नव्याने लढवावी लागते. त्याची तयारी शून्यापासून करावी लागते. निवडणूक लढायची आहे, तर पहिल्या टप्प्यात आपल्याला नोंदणी करावी लागते. झालेल्या नोंदणीचं मतांमध्ये रुपांतर करावं लागतं.
ही निवडणूक फार मोठ्या प्रचाराची किंवा गाजावाजा करायची निवणडूक नसते. परंतु, हळूहळू लोकांना माहित होत चाललंय की या निवडणुकीचं स्वरुप दिवसेंदिवस बदलत आहे. पूर्वी ही निवडणूक कधी होत होती, हे कळत नव्हतं. पण आता ही निवडणूक सर्व राजकीय पक्षांना कळायला लागली आहे. उमेदवार कुणीही असला, तरी ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. कार्यकर्ते ठरवत असतात, कशा पद्धतीने निवडणूक लढवायची. या निवडणुकीत प्रचार करावा लागत नाही. मतदानाची तारीख असते. परंतु, त्यांनाच मतदान करायला मिळतं, ज्यांची नोंदणी झाली आहे. गेले कित्येक वर्ष मी बघतोय, शिवसैनिक कितीही शिकलेला असो, पण जास्तीत जास्त पदवीधराची नोंदणी करायीच ताकद ही फक्त शिवसैनिकामध्येच आहे. दुसरा कुणीही नाही. ही निवडणूक एव्हढी सोपी नाहीय.
लोकांच्या घरी जावं लागतं. वारंवरा त्यांचे फोटो मागावे लागतात. त्यांच सर्टिफिकेट मागावं लागतं. लोकांकडे तीन-चार वेळा जावं लागतं. पण शिवसैनिक एव्हढा चिवट असतो, तो जाऊन ते घेऊन येतो आणि नोंदणी करून घेतो. या मतदारसंघात १ लाख २० हजार मतांची नोंदणी झालेली आहे. या मतांमध्ये मुंबई उपनगरात म्हणजे दहिसर ते वांद्रे या मतदारसंघात साधारपणे ५० हजार मतं नोंदवली गेलेली आहेत. मुंबईची अर्धी लढाई या दोन विभागातच आहे. विजयाचा पाया इथूनच रचला जाणार आहे. त्यासाठी या विभागातील शिवसैनिकांची मेहनत कामाला येणार आहे. निवडणूक म्हणजे ती जिंकण आणि त्याला पूर्णविराम देणं, असंही अनिल परब म्हणाले.