स्वप्नील जाधव
मुंबई पदवीधर मतदारसंघातील शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटाचे उमेदवार अनिल परब यांच्या निवडणूक ‘वचननामा’चे प्रकाशन उद्या शनिवारी २२ जूनला होणार आहे. यावेळी शिवसेनेच्या मेळाव्यात शिवसेना नेते व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू व शिक्षणतज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर हे मार्गदर्शन करणार आहेत. वांद्रे-कुर्ला संकुलातील मुंबई क्रिकेट असोसिएशन क्लबमध्ये इंनिंग्ज हॉल येथे वचननामा प्रकाशन व मेळाव्याचा कार्यक्रम होणार आहे.
काय म्हणाले अनिल परब?
रोजगार हा आपल्याकडे ज्वलंत प्रश्न बनला आहे. याची प्रचिती नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी दाखवून दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर पदवीधरांना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये संधी मिळण्यात सहाय्य होईल, याबाबतचा सविस्तर रोड मॅप तयार केला आहे. शिवसेनेचा हा वचननामा मुंबईतील पदवीधरांच्या शैक्षणिक व रोजगार संधीबाबतच्या समस्या सोडवण्यासंदर्भात दिशादर्शक ठरणार आहे.
या कार्यक्रमाला मुंबईतील शिक्षणतज्ञ, पदवीधर मतदार आणि शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थिती राहणार आहेत. राज्यात विधानपरिषदेच्या चार जागांची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यातील मुंबई पदवीधर मतदारसंघातून ॲड. अनिल परब यावेळी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. गेली ३० वर्षे मुंबई पदवीधर मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. २६ जून रोजी या मतदारसंघासाठी मतदान होत आहे.
'असा' आहे वचननामा
- सर्व शासकीय नोकरीच्या परीक्षा आणि पदांच्या अर्जासाठी पदवीधरांना एका वर्षात फक्त एक वेळचे वार्षिक शुल्क आकारणी करण्यास शासनाला भाग पाडणार
- मुंबई उपनगरात बाळासाहेब ठाकरे आयएएस अकादमीची शाखा स्थापन करणार
- व्हिसा,पासपोर्ट प्रक्रिया, परदेशी शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश यासंदर्भात ‘हेल्प डेस्क’ची स्थापना करणे.
- पदवीधरांना पुरेशा संधी उपलब्ध करून देण्यासाठी वार्षिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रोजगार आणि शैक्षणिक मेळावा आयोजित करणार
- विशेषत: मुंबई आणि महाराष्ट्रातील मराठी माणसाला आपल्या हक्काची घरे मिळावी या उद्देशाने अशासकीय विधेयक सादर करणार
- मुंबईत मोफत रुग्णवाहिका आणि मुंबईतील रक्तपेढ्यांमधून मोफत रक्त पुरवठ्यासाठी प्रयत्न करणार
- दर्जेदार आरोग्यसेवा मिळाव्यात म्हणून पदवीधर मतदारांसाठी वैद्यकीय विमा लागू करण्यासाठी प्रयत्न करणार
- मुख्यमंत्री फेलोशिपच्या धर्तीवर पदवीधरांसाठी विधानपरिषद आमदार फेलोशिप प्रोग्राम राबवणार