2019 च्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील अंधेरी पूर्व येथून शिवसेनेचे उमेदवार रमेश लटके यांनी विजय मिळवला होता. काही महिन्यांपूर्वी दुबईत हृदयविकाराच्या झटक्यानं रमेश लटके यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक घेतली जात आहे.या पोटनिवडणुकीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
मात्र ऋतुजा लटके या महापालिकेच्या कर्मचारी होत्या. त्यांनी महिन्याभरापूर्वीच आपल्या प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिला आहे. मात्र अद्याप हा राजीनामा मंजूर करण्यात आलेला नाही. जोपर्यंत लटके यांचा राजीनामा अर्ज मंजूर होत नाही, तोवर त्यांना निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरता येणार नाही. या निवडणुकीसाठी 3 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर न झाल्यानं ठाकरे गटाच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लटके यांचा राजीनामा लवकर मंजूर करावा यासाठी शिवसेना नेते अनिल परब, माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पालिका आयुक्त इकबालसिंह चहल आणि सामान्य प्रशासनचे सह आयुक्त मिलिन सावंत यांची भेट घेतली.