कॉर्डिलिया क्रूझवरील ड्रग्स प्रकरणी छापेमारीवेळी शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक न करण्यासाठी २५ कोटींची खंडणी मागितल्याचा समीर वानखेडेंवर आरोप आहे. यावरुन वानखेडेंची तब्बल साडेसहा तास सीबीआय चौकशी झाली. तर, आता याप्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. एकीकडे सीबीआयकडून चौकशी सुरू असतानाच सीबीआयसी (CBIC)कडूनही चौकशी सुरू झाली आहे. यामुळे वानखेडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
एनसीबीच्या एसआयटीने तयार केलेला अहवाल सीबीआयसी विभागाकडेही देण्यात आला आहे. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर आता याच अहवालाच्या आधारे त्यांची विभागीय चौकशी सुरू झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या चौकशीनंतर वानखेडे यांच्यावर लवकरच कारवाई होण्याची शक्यता असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाईदेखील होऊ शकते.
यासर्व प्रकरणावर आता समीर वानखेडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्याविरोधात खोटी तक्रार आहे. न्यायालयाने स्थगिती दिलेली असताना हे प्रकरण कसे आले मला माहिती नाही. मी सीबीआयच्या चौकशीला सहकार्य करत आहेत. अतीक अहमदसारखी घटना घडू शकते. त्यामुळे मी जे काही आहे त्याबाबत पत्रातून मुंबई पोलिसांना कळवणार. सोशल मीडियावर सातत्याने धमकी दिली जात आहे.