मध्यप्रदेशातल्या (Madhya Pradesh) मोरेना जिल्ह्यातला एक धक्कादायक आणि हृदयद्रावक व्हिडीओ समोर आलाय. 8 वर्षांचा एक मुलगा रस्त्याच्या कडेला आपल्या दोन वर्षांच्या लहान भावाचा मृतदेह मांडीवर घेऊन बसल्याचा आहे. तिथल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान या लहान भावाचा मृत्यू झाला.
गरीब घरच्या या मुलाच्या वडिलांना रुग्णालयानं अँम्ब्युलन्स नाही असं सांगितलं. आधीच पोटचा गोळा गमावलेल्या वडिलांना काय करावं कळेना. दोन वर्षांच्या पोराचे कलेवर खांद्यावर घेऊन ते रस्त्यावर आले, पण एकही वाहन त्यांना मिळेना.
8 वर्षाच्या दुसऱ्या मुलाला मृतदेहाशेजारी बसवून वाहन शोधण्यासाठी जाण्याशिवाय त्यांच्याकडं पर्याय उऱला नव्हता. रस्त्यावरुन जाणाऱ्या काही लोकांच्या निदर्शनास ही गोष्ट आली. आठ वर्षांचे निष्पाप पोर असे का बसले आहे आणि त्याच्या मांडीवर निष्प्राण बालक कोण आहे ? याची काहींनी विचारपूस केली. वास्तव ऐकणाऱ्या प्रत्येकाला धक्का बसत होता. कोणी तरी लगेच याची माहिती पोलिसांना कळवली. पोलिसांनीही मग तातडीनं अँब्युलन्स आणून मृतदेह मुलाच्या गावी नेण्यास मदत केली.