अमरावती : राज्यात सध्या मशिदीवरचा भोंगा विरुद्ध हनुमान चालीसा असा मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यातच आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) व आमदार रवी राणा (Ravi Rana) या दाम्पत्याने पुन्हा एकदा यावरुन आक्रमक भुमिका घेतली आहे.
उद्या हनुमान जयंती दिनी अमरावतीत हनुमान मंदिरात राणा दाम्पत्याकडून हनुमान चालीसाचे पठण होणार आहे. तसेच त्यांनी जाहीर केलं की, सर्व मंदिरात हनुमान मंदिरांमध्ये हनुमान चालीसाचं पठण व्हावं यासाठी मोफत भोंग्याचं वाटप देखील करणार आहे अशी माहिती आमदार रवी राणा यांनी दिली. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा हनुमान जयंती दिनी मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण केलं पाहिजे अशी प्रतिक्रिया रवी राणा यांनी दिली.
दरम्यान, दोन दोन दिवसांपूर्वी खासदार नवनीत राणा यांनी एका मंदिरात हनुमान चालीसा पठण केली होती. त्यातच आता उद्या हनुमान जयंतीनिमित्त राणा दाम्पत्याने सामूहिक हनुमान चालीसाचा पठनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर हनुमान चालीसा पठणाचा मुद्दा सध्या चर्चेत असून, राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.