लोकसभा निवडणुकीचा काल निकाल जाहीर झाला. राज्यात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत 30 जागांवर आघाडी घेतली तर महायुतीला 17 जागा मिळाल्या. यातच शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात लढत होती. या लढतीत शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे विजयी झाले.
याच पार्श्वभूमीवर अमोल कोल्हे यांनी ट्विट केलं आहे. अमोल कोल्हे म्हणाले की, हा विजय शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेला व महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना समर्पित. मायबाप जनतेचा आशीर्वाद, स्वाभिमानी सहकाऱ्यांची साथ, लोकनेते श्री. शरदचंद्रजी पवार साहेब, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस नेते श्री. राहुलजी गांधी, आम आदमी पार्टीचे श्री. अरविंद केजरीवाल यांनी दाखवलेला विश्वास या बळावर आपण हा विजय मिळवला आहे.
यासोबतच ते म्हणाले की, आपला हा विजय म्हणजे केवळ मतांची बेरीज - वजाबाकी नाही, हा महाराष्ट्राने देशाला दिलेला खरमरीत संदेश आहे. महाराष्ट्रासोबत गद्दारी कराल, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा अपमान कराल तर हा स्वाभिमानी महाराष्ट्र शांत बसणार नाही, महाराष्ट्राचा हाच करारी बाणा कायम ठेवत यापुढेही महाराष्ट्राच्या हितासाठी संसदेत लढत राहणार हा शब्द आहे. या संघर्षात प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे साथ देणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार! जय शिवराय ! असे अमोल कोल्हे म्हणाले.