कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा आहे. निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी हटवली आहे. आता सर्वच देशांमध्ये कांदा निर्यात करता येणार असून 40 टक्के निर्यातशुल्क लावून कांदा निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी हटवली असून मेट्रिक टनाला 550 डॉलर किमान निर्यात मूल्य असणार आहे.
याच पार्श्वभूमीवर आता अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमोल कोल्हे म्हणाले की, कांदा निर्यात बंदी जी उठवली ही फसवी निर्यात बंदी उठवली आहे. आपणही सगळेजण जाणता. प्रत्येक मेट्रीक टन वर 550 डॉलर अधिक चार्ज आहे आणि 40 टक्के निर्यात शुल्क आहे. हे जर बघितले तर जागतिक बाजारपेठेमध्ये कांदा ज्या किमतीला उपलब्ध होतो, इजिप्तचा कांदा साधारणता 35 रुपयाला उपलब्ध होईल, श्रीलंकेचा कांदा 50, 55 रुपयांना उपलब्ध होईल, पाकिस्तानचा कांदा 60 रुपयाला उपलब्ध होईल.
तसेच ते पुढे म्हणाले की, या पद्धतीचा 550 डॉलरचे शुल्क त्याच्यावर 40 टक्के निर्यात शुल्क पाहिलं तर भारतीय कांद्याची जागतिक बाजारपेठेत वाहतूक खर्च जमा होऊन त्याची किंमत साधारणता 65 ते 70 रुपये होईल. स्वाभाविक इतर देशांचा कांदा हा व्यापाऱ्यांकडून जागतिक बाजारपेठेत खरेदी केला जाईल. त्यामुळे ही जी निर्यातबंदी उठवल्याचे केंद्र सरकार सांगतेय ती शेतकऱ्यांच्या आणि व्यापाऱ्यांच्या डोळ्यातली धूळफेक आहे. असे अमोल कोल्हे म्हणाले.