ताज्या बातम्या

Amit Thackeray : सिनेट निवडणूक स्थगितीवरून अमित ठाकरेंची टीका; पोस्ट करत म्हणाले...

Published by : Siddhi Naringrekar

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. 22 सप्टेंबरला होणारी मुंबई विद्यापीठाची निवडणूक स्थगित करण्यात आली असून पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. ही निवडणूक स्थगित करण्यात आल्याचे परिपत्रक मुंबई विद्यापीठाकडून जारी करण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठाची निवडणूक 22 सप्टेंबरला होणार होती. मात्र आता या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळत आहे. महाराष्ट्र शासनाकडून आदेश प्राप्त झाल्याने निवडणूक स्थगित करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर आता अमित ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. अमित ठाकरे म्हणाले की, मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले. दिनांक २२ सप्टेंबर २०२४ रोजी मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर सिनेट निवडणुका पार पडणार होत्या. मात्र, विद्यापीठाने पुन्हा एकदा मागील वेळेसारखंच रात्रीच्या वेळेस एक परिपत्रक काढून निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्याचे जाहीर केले आहे. ही काही पहिली वेळ नाही. मागील निवडणुका जाहीर झाल्यानंतरही रात्रीच्या वेळीच राजकीय दबावाला बळी पडून परिपत्रक काढले गेले होते. आता दुसऱ्यांदा अशाच प्रकारे सिनेट पदवीधर निवडणुकांसंदर्भात परिपत्रक काढण्यात आले आहे, आणि प्रत्येक वेळी रात्रीच परिपत्रक निघते, त्यामुळे मुंबई विद्यापीठाचा कारभार रात्रीस खेळ चाले या मालिकेसारखा चालू आहे की काय, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

मुळात कोणतीही निवडणूक, मग ती स्थानिक स्वराज्य संस्थेची असो, विधानसभेची असो, लोकसभेची असो, अथवा मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका असो, या सहकारी व पदाधिकाऱ्यांच्या मेहनतीवर आणि परीश्रमांवर लढवल्या जातात. त्यासाठी राजकीय संघटनांचे, विद्यार्थी संघटनांचे अनेक सहकारी व पदाधिकारी दिवस-रात्र परिश्रम करत असतात. परंतु, मुंबई विद्यापीठाने जर सिनेट पदवीधर निवडणुका जाहीर करून रद्द करण्याचेच धोरण अवलंबले असेल, तर याचा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जाहीर निषेध करते. निवडून आलेले सिनेट सदस्य हे विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढून त्यांना त्यांचे हक्क मिळवून देतात. त्यामुळेच या निवडणुकांचे गांभीर्य विद्यापीठाला लवकरात लवकर समजले तर बरे होईल. मागील वेळीसुद्धा जेव्हा विद्यापीठाने निवडणुका रद्द केल्या होत्या, तेव्हा मी स्वतः पत्रकार परिषद घेऊन या बाबतीत मुंबई विद्यापीठाच्या अनाकलनीय कारभाराचा जाहीर निषेध केला होता. मुंबई विद्यापीठ हे राजकीय दबावाला बळी पडत असून, एक स्वतंत्र यंत्रणा म्हणून त्यांनी काम करणे अपेक्षित आहे. परंतु, त्यांची ही भूमिका संशयास्पद आहे.

म्हणूनच यावेळी जेव्हा मुंबई विद्यापीठाने पुन्हा निवडणुका जाहीर केल्या, त्याचवेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने या निवडणुकांचा सखोल अभ्यास केला आणि निवडणुका कायद्याला धरून नसल्याचे लक्षात आल्याने, त्या पुन्हा पुढे ढकलल्या जातील अशी शक्यता आधीच व्यक्त केली. माझे सहकारी निवडणूक लढवण्याच्या बाजूने होते. त्यांचा सन्मान राखत, त्यांना विद्यापीठाचा भविष्यातील भोंगळ कारभार समजावून सांगितला आणि त्यांनाही परिस्थितीची जाणीव झाली. त्यामुळेच माझ्या सहकारी आणि पदाधिकाऱ्यांचे परीश्रम वाया जाऊ नयेत, म्हणून आम्ही २२ सप्टेंबर २०२४ रोजी होणाऱ्या सिनेट पदवीधर निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतला. काल मुंबई विद्यापीठाने परिपत्रक काढून निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या आहेत, हे पाहून आम्ही घेतलेला निर्णय योग्य असल्याचे सिद्ध झाले आहे. मुंबई विद्यापीठ प्रशासनाला लवकरच निवडणुकीचा चालवलेला हा खेळ बंद करण्याची सद्बुद्धी येवो, ही अपेक्षा व्यक्त करतो. असे अमित ठाकरे म्हणाले.

Navra Majha Navsacha 2: "नवरा माझा नवसाचा 2" पहिल्याच दिवशी बाप्पाने दिला कौल! पहिल्या दिवशी केली 'एवढी' कमाई

Mumbai: मुंबईतील धारावीत तणावाची स्थिती; शेकडो नागरिक रस्त्यावर, वाहनांची तोडफोड

CM Eknath Shinde: जुहू चौपाटी स्वच्छता मोहिमेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Sanjay Raut : मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित; संजय राऊत म्हणाले...

AFG vs SA ODI: अफगाणिस्तान आफ्रिकेला 134 धावांत गुंडाळून दुसरा सामना 177 धावांनी जिंकला; मालिका 2-0 जिंकले