ताज्या बातम्या

Amit Thackarey: 'हे' फक्त शब्द नाहीत, तर इशारा आहे', चिमुकलीवरील अत्याचारावर अमित ठाकरेंचं ट्विट

अमित ठाकरेंनी चिमुकलीवरील अत्याचारावर ट्विटद्वारे व्यक्त केला संताप, 'हे' फक्त शब्द नाहीत, तर गंभीर इशारा.

Published by : Team Lokshahi

सध्या गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातचं नव्हे तर संपूर्ण देशात महिला अत्याचाराच्या अनेक बातम्या ऐकायला मिळत होत्या. महाराष्ट्रातील बदलापूरातील दोन चिमुकल्यांवरील अत्याचाराच्या घटनेनंतर आता सायन कोळीवाड्यातील एक अत्याचाराची बातमी समोर आली आहे. काल रात्री सायन कोळीवाड्यातील पंजाब कॉलनीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. तीन वर्षांच्या चिमुकलीवर ड्रग्सच्या नशेत असलेल्या नराधम अनिल गुप्ताने अमानुष अत्याचार केला. याचपार्श्वभूमीवर मनसे नेते राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे जे माहिम मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीसाठी रिंगणात उतरले होते. अमित ठाकरेंनी फेसबुक आणि ट्वीटद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे.

'हे' फक्त शब्द नाहीत, तर इशारा आहे'- अमित ठाकरेंची पोस्ट

सायन कोळीवाड्यातील पंजाब कॉलनीत काल रात्री घडलेल्या एका भयंकर घटनेनं संपूर्ण मुंबई हादरली आहे. तीन वर्षांच्या चिमुकलीवर ड्रग्सच्या नशेत असलेल्या नराधम अनिल गुप्ताने अमानुष अत्याचार केला. आज ती चिमुकली सायन रुग्णालयात जीवनमरणाच्या झुंजीत आहे. हा केवळ एका चिमुकलीवर नाही, तर आपल्या समाजाच्या संवेदनांवर झालेला आघात आहे. मुंबईसह इतर शहरांमध्ये दिवसेंदिवस ड्रग्सचं प्रमाण वाढतं आहे, अनेक घरं उद्ध्वस्त होत आहेत. महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. दादर, सायनसारख्या भागातही ड्रग्सच्या विळख्यात गर्दुल्यांची संख्या वाढली असून महिलांनी याबाबत माझ्याकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत.

कालच भारतीय नौसेनेकडून अंदमान समुद्रात ५ टन ड्रग्स वाहून नेणाऱ्या मच्छीमार बोटीवर कार्यवाही करण्यात आली. एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स भारतात येतं कुठून? ते पोहोचतं कुठे? आणि याच्या पाठीमागे असलेला सूत्रधार कोण? या प्रश्नांची उत्तरं मिळवणं आणि ड्रग्सचं नेटवर्क मोडून काढणं आता अत्यावश्यक झालं आहे. मनसेनं सुरुवातीपासूनच अशा नराधमांवर कठोर कारवाईसाठी भूमिका घेतली आहे. म्हणूनच माझ्या वचननाम्यात मी ड्रग्स विक्री, सेवन करणाऱ्यांवर कठोर उपाययोजना करण्याचं वचन दिलं होतं आणि आज त्या दिशेनं पाऊलं टाकत आहे.

सायनमधील या नराधमाला अटक झाली असली, तरी फक्त अटक पुरेशी नाही. काही महिन्यांपूर्वी सायन रुग्णालयात महिला डॉक्टरवर मद्यधुंद पेशंटने अतिप्रसंग केल्याची घटना समोर आली होती. या सगळ्याचा तपास जलदगतीने आणि प्रभावी पद्धतीने पूर्ण झालाच पाहिजे. आरोपीला न्यायालयीन प्रक्रियेतून कडक शिक्षा झालीच पाहिजे. जर या प्रकरणात ठोस कारवाई झाली नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा नराधमांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही! हे फक्त शब्द नाहीत, तर इशारा आहे. मुलींच्या सुरक्षिततेसाठी, ड्रग्समुक्त महाराष्ट्रासाठी मनसेचा संकल्प अटळ आहे. आता वेळ आली आहे की आपण सगळ्यांनी एकत्र उभं राहून या नराधमांना आणि त्यांच्या समर्थकांना जशास तसं उत्तर देण्याची!

Latest Marathi News Updates live: भिवंडी शहर तसेच ग्रामीण भागात भूकंपाचे सौम्य झटके

Special Report | Marathwada | Manoj Jarange पॅटर्न फेल, महायुतीचा विजय तर विरोधकांचा सुपडासाफ?

Special Report | Mahayuti | Maharashtra CM | Shiv Sena - BJP वादात राष्ट्रवादीचे राजकारण

Babasaheb Deshmukh: बाबासाहेब देशमुख यांचा भाजपला पाठिंबा? शेकाप महाविकास आघाडीची साथ सोडणार?

Rahul Gandhi: 'जिथे काँग्रेसचं सरकार, तिथे जातीय जनगणना होणार', राहुल गांधींचं वक्तव्य