पावसाळ्यात वाहनं स्लीप झाल्यानं अनेक अपघात होत असल्याचं आपण पाहतो. मात्र कर्नाटकमधून समोर आलेल्या या अपघाताचा व्हिडिओ पाहून तुमच्या काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. सोशल मीडियावरुन समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये एक रुग्णवाहिका प्रचंड वेगानं टोल नाक्यावर येऊन धडकताना दिसतेय. यादरम्यान, टोल कर्मचारी बॅरीकेड हटवताना दिसतात, मात्र काही क्षणात ही रुग्णवाहिका त्यांचाही काळ बनून पुढे जाते अन् टोल बुथला धडकते.
रुग्णवाहिका चालकाने रस्त्यावर ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला, मात्र रस्ता ओला असल्यानं वाहनावर नियंत्रण मिळवता आलं नाही. फुटेजमध्ये, काही सुरक्षा रक्षक आणि टोल कर्मचारी दिसत आहेत. रुग्णवाहिका जवळ येत असल्याचं पाहून एका गेटमधू प्लास्टिकचं बॅरिकेड्स काढण्यासाठी धावताना दिसतोय.
व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय, की रुग्णवाहिका ओल्या रस्त्यावरून गेली होती. यामुळे अॅक्वाप्लॅनिंग/ हायड्रोप्लॅनिंगची परिस्थिती निर्माण झाली होती. जेव्हा वाहनाचं टायर पाण्यामुळे जमीनीशी ग्रीप पकडू शकत नाही. तेव्हा वाहनावरील नियंत्रण पुर्णपणे सुटतं. त्यामुळे तुम्हीही वाहन चालवत असाल तर ओल्या रस्त्य़ावरुन चालवताना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.