अकोला।अमोल नांदूरकर: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अंतर्गत येत असलेल्या अकोला विधी महाविद्यालय शिष्यवृत्तीधारक मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारण्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.
अकोला शहरात दोन विधी महाविद्यालय हे विधी विषयाचे शिक्षण देत असून त्यामधील अकोला विधी महाविद्यालयात पाच वर्षीय अभ्यासक्रमासाठी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी नामे अंकुश अनिल गावंडे यांनी गेल्या काही दिवसांआधी समाज कल्याण आयुक्त यांच्याकडे महाविद्यालयातून अतिरिक्त शुल्क आकारत असल्याची तक्रार दिली होती. याचाच वचपा काढत अकोला विधी महाविद्यालय प्राचार्य व् मॅनेजमेन्ट यांनी अंकुश गावंडे यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाचा प्रवेश रोखून धरला होता, याचा निषेध नोंदवत गावंडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी अकोला जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी संघटना एकत्रित येऊन अकोला विधी महाविद्यालय येथे ठिय्या आंदोलन केल्यामुळे प्रशासनाने पुढील शैक्षणिक वर्षाला अंकुश गावडेंना प्रवेश दिला.
सदर चौकशीच्या अनुषंगाने समाज कल्याण विभाग अकोला तर्फे चौकशी समिती नेमून दिनांक 16 9 2022 रोजी महाविद्यालय येथे चौकशी करून अकोला महाविद्यालयाने सामाजिक न्याय विभागाच्या शासन निर्णय 12 ऑगस्ट 2018 अन्वये शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शिक्षण शुल्क आकारणी करण्यात येऊ नये असे स्पष्ट नियम असताना अकोला विधी महाविद्यालयाचे अतिरिक्त शिक्षण शुल्काची आकारणी केले असल्याचा स्पष्ट अहवाल चौकशी समितीने सादर केला आहे.त्यामुळे पुढे आता या प्रकरणात महाविद्यालयावर कुठल्या प्रकारची कारवाई करण्यात येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.