राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जतमध्ये पार पडलेल्या वैचारिक मंथनात खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. 2019 मध्ये सरकार स्थापन करण्याच्या वेळी प्रकाश सोळंके नाराज झाले होते आणि ते राजीनामा देण्याच्या तयारीत होते, असं ते म्हणाले.
काय म्हणाले अजित पवार?
2019मध्ये सरकार स्थापन करण्याच्या वेळी प्रकाश सोळंके साहेब नाराज झालेले. अशोक डक, मी स्वतः, प्रकाश सोळंके आणि जयंत पाटील काही वेळेस धनंजय मुंडे, अशा आमच्या बैठका होत होत्या. प्रकाश साळुंके नाराज होते. त्यावेळी ते राजीनामा देण्याच्या तयारीत होते. बातम्या काढून बघा. आम्ही म्हटलं अहो आत्ताच सरकार आलं आहे, एवढी टोकाची भूमिका तुम्ही घेऊ नका. त्यांचं म्हणणं मी काय पक्षासाठी कमी केलं. गेल्या टर्ममध्येही तुम्ही मला मध्येच सहा महिने की वर्षभर असं आधीच काढून टाकलं. कारण काय? पक्षानं अशी भूमिका माझ्याबाबत का घेतली? आता पक्ष सत्तेत आलाय. मंत्रीपदं मिळत आहेत, तर मलाही मिळालं पाहिजे. रास्त मागणी त्यांची होती. शेवटी मी, प्रकाश सोळंके आणि जयंत पाटील तिथल्या एक चेंबरमध्ये गेलो. त्यांना समजावलं. असं करु नका. पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीच्या वैळी मिठाचा खडा लागणं बरोबर नाही. वैगरे वैगरे वैगरे वैगरे...", असं अजित पवार म्हणाले.
तर मग मी आणि जयंत पाटलांनी प्रकाश सोळंकेंना कार्याध्यक्ष पदाचा शब्द दिला आणि जयंत पाटलांनी काय सांगितलं आपल्याला? एक वर्ष मी अध्यक्ष राहतो. एक वर्षांनी तुम्ही कार्याध्यक्षाचे अध्यक्ष व्हा. संघटनेची जबाबदारी तुम्ही पार पाडा. हे प्रकाश सोळंकेंनी ऐकलं, म्हणाले, असं होत असेल तर ठिक आहे. मला जबाबदारी द्या, मला काम करायचं आहे. एक वर्ष झालं मी म्हटलं जयंतराव आपण शब्द दिला आहे. जयंत पाटील म्हणाले, हो शब्द दिला आहे, पण वरिष्ठ म्हणतायत, थांब तूच राहा. मी म्हटलं तुम्ही वरिष्ठांना सांगा ना, नको मला बास झालं, मला मंत्रिपद आहे, तिथेच वेळ देता येत नाही. जलसंपदा खात्याची मोठी जबाबदारी होती. जलसंपदा खातं काही साधंसुधं खातं नाही. पण, ते असंच पुढे ढकलत ढकलत सुरूच होतं. हे बरोबर नाही. माझं म्हणणं आहे की, एकदा तुम्ही शब्द दिला ना की, एखादा महिला पुढे मागे ठिक आहे ना. शब्द देताना दहा वेळा विचार करुन शब्द द्या ना. पण यापद्धतीनं कार्यकर्त्यांना नाराज करायचं. हे मला अजिबात आवडत नाही. कुणाला नाराज करू नका, संघटनेसाठी केलेल्या या बारिक बारिक गोष्टी साठत राहतात आणि मग त्यांचा अशा पद्धतीने उद्रेक होतो"
मी जे बोलतो ना, त्यातलं एक अक्षर चुकीचं आणि खोटं बोलणार नाही. कारण काय? आपला परिवार आहे, कुटुंब आहे. आपण आपल्या घरात खरं बोललं पाहिजे. त्यामध्ये ज्यावेळेस मी देवेंद्र फडणवीसांसोबत एकत्र येत शपथ घेतली, ते सर्वांना माहीत आहे. झालं गेलं गंगेला मिळालं." असं ते म्हणाले.