Ajit Pawar  Lokshahi
ताज्या बातम्या

"...म्हणून लोकसभा निवडणुकीचा निकाल थोडासा वेगळा लागला"; अजित पवारांनी सांगितलं खरं कारण

Published by : Naresh Shende

Ajit Pawar Speech : लोकसभेचा निकाल थोडासा वेगळा लागला. मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. पण अल्पसंख्यांक समाज महायुतीपासून थोडासा बाजूला गेलेला पाहायला मिळाला. त्यांच्या मनात काहीतरी भीती होती की, पुन्हा हे आले तर काहीतरी वेगळं करतील आणि आपल्याला मताचा अधिकार देणार नाही किंवा आपल्यावर अन्याय होईल. पण असं काहीही घडलं जाणार नाही. कारण हा भारत देश आहे. हा सेक्युलर विचाराचा आहे. यामध्ये रयतेचा राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख आहे. त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेतलं. तीच लाईन आम्ही एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या महायुतीनं धरली आहे, असं मोठं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. चे पिंपरी-चिंचवड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलत होते.

अजित पवार पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलणार, अबकी बार ४०० पार कशाला पाहिजे, यांना घटना बदलायची आहे, यांना संविधान बदलायचं आहे, यांना मागासवर्यीय आणि आदिवासींचं आरक्षण काढायचं आहे, सीएएचा कायदा आणून काही लोकांना भारतातून बाहेर काढायचं आहे, असं काहीही गोरगरिबांना सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला. हे चुकीचं सांगत आहेत. हे धादांत खोटं आहे. हे लोकांची दिशाभूल करत आहे, असं सांगण्यात दुर्देवाने आम्ही कमी पडलो. पण लोकांनी आमच्यावर विश्वास कमी ठेवला आणि त्यांच्या म्हणण्यावर महाराष्ट्राने जास्त विश्वास ठेवला. त्यानंतर आपण सर्वांनी निकाल बघितला.

आता विधानसभेची निवडणूक आहे. अनेक वर्ष तुम्ही सर्वांनी मला अर्थमंत्रालय दिलं आहे. या निवडणुकीत समोरचे काहीतरी वेगळं सांगून तुम्हाला टीका टीप्पणी करायला सांगतील. पण आपल्याला कुणावरही टीका टीप्पणी करायची नाही. त्यामध्ये वेळ घालवायचा नाही. आपल्याला विकास करायचा आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत तसच पुणे पिंपरी-चिंचवडचे प्रश्न सोडवायचे आहेत.

त्या पद्धतीने मी मेट्रोची कामे हातात घेतली आहेत. बाकीच्याही भागात मेट्रो नेण्याचा आमचा सर्वांचा प्रयत्न असणार आहे. काही जवळची गावं कोणत्या महानगरपालिकेत टाकायची की नवीन महानगरपालिका निर्माण करायची, त्याबद्दलचा अभ्यास मी आणि माझे सहकारी करत आहोत. जे जनतेच्या मनात असेल, ते करण्यासाठी महायुती कटीबद्ध असेल, असंही अजित पवार म्हणाले.

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीकडून गुन्ह्याची कबुली

राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा आज कोकणात

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाकडून आज बीडसह, धाराशिव बंदची हाक

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस; प्रकृती खालावली