फोन टॅपिंग प्रकरणावरून विधानसभेतून विरोधी पक्षाकडून सभात्याग करण्यात आला आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. विधानसभेत अजित पवार, नाना पटोले यांनी रश्मी शुक्लांचा मुद्दा उपस्थित केला आहे. रश्मी शुक्ला कोणाच्या नावाखाली फोन टॅप करायच्या , त्यांना पाठिशी का घातलं जातंय. असा सवाल विचारण्यात येत आहे. राज्यात सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस सरकार येताच राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणात वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना क्लीन चिट देण्यात आली होती. विधानसभेत विरोधकांनी सरकारविरोधी घोषणाबाजी देत प्रश्नोत्तरांऐवजी रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणावर चर्चा करण्याची मागणी केली.
“कुणाच्या आदेशाने रश्मी शुक्ला फोन टॅप करत होत्या? याचा खटला चालू होता. सूत्रधाराचा पर्दाफाश होईल, अशी भीती विद्यमान सरकारच्या मनात आली का? भारतीय टेलिग्राफ अॅक्टचं उल्लंघन करण्यात आलं. विधिमंडळ सदस्यांच्या स्वातंत्र्याचा संकोच केला गेला. हे लोकशाहीला घातक नाही का? अशा अधिकाऱ्याला का पाठिशी घातलं जातं? शेवटी तो तपास थांबवण्याचा प्रयत्न केला गेला. उच्च न्यायालयाने मध्यस्थी करून सांगितलं की अशा प्रकारे तुम्हाला प्रकरण मागे घेता येणार नाही. अध्यक्ष महोदय हे काय चाललंय?” असे म्हणत अजित पवार यांनी जाब विचारला आहे.
तसेच “कोणी सदस्य असतं, कोणी मंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष असतं. या सरकारच्या मागच्या काळात एक लक्षात आलं की त्यावेळचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि सभागृहाचे सदस्य नाना पटोले, माजी राज्यमंत्री बच्चू कडू, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार आशिष देशमुख, माजी खासदार संजय राऊत, एकनाथ खडसे अशा अनेक राजकीय नेत्यांचे कोणतंही प्रबळ कारण नसताना फोन टॅप करण्यात आले. त्याची चौकशी करण्यात आली. त्यावेळी एक जबाबदार ज्येष्ठ महिला आयपीएस अधिकारी त्यात संबंधित आहे हे लक्षात आलं. त्यांचं नाव रश्मी शुक्ला असं अजित पवार म्हणाले.