नाशिक : राज ठाकरे यांच्या औरंगाबादच्या भाषणामुळे सध्या राज्यात वातावरण ढवळून निघालं होतं. राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेवरुन सध्या त्यांच्यावर विरोधकांकडून टीका केल्या जात होत्या. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज ठाकरेंच्य वक्तव्यांचा समाचार घेतला आहे. नाशिमध्ये एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करत असताना अजित पवार यांनी राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) आरोपांना प्रत्युत्तर दिलं. शिवाजी महाराज श्रद्धाळू होते, मात्र अंधश्रद्धाळू नव्हते असं अजित पवार यावेळी म्हणाले. लोकांना बिघडवण्याचं, फसवण्याचं काम करु नका असं आवाहन अजित पवारांनी केला. छत्रपती शिवाजी महाराज, शाहु, फुले आंबेडकर यांच्या महाराष्ट्रातील सलोखा कायम राहील यासाठी प्रयत्न केले पाहिजे असं अजित पवार म्हणाले.
राज्यातील वातावरण चांगलं असेल तरच परकीय गुंतवणूक होईल असं अजित पवार यावेळी म्हणाले. लोकांना भडकवून प्रश्न सुटत नाहीत असंही अजित पवारांनी यावेळी सांगितलं. यांनी कधी कुठलीही संस्था उभारली नाही, उभारण्यात कुणाला मदत केली नाही. कधी सोसयट्या काढल्या नाहीत. लोकांचे संसार उभे करणं कठीण असतं, मोडतोड करायला कष्ट लागत नाही असं म्हणत अजित पवार यांनी टोला लगावला.
अजित पवार पुढे म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने 5 वाजता स्पीकर सुरु करायला सांगितले आहेत. पण आपल्याकडे शिर्डीत पाच वाजता काकड आरती होते, ग्रामीण भागात सप्ताह असतो तो रात्री असतो, जाग्रण गोंधळ रात्री असतं. सध्या उरुस जत्रा आहे, तिथे सांस्कृतीक कार्यक्रम होतात. जर कायद्याने वागायचं म्हटलं तर ते सगळं बंद करावं लागेल असं अजित पवार म्हणाले आहेत.
राज ठाकरेंच्या सभा संध्याकाळी, रात्री थंड वारं सुटल्यावर यांची सभा असते. दुपारी 2 वाजता कधी यांची सभा ऐकली का? असा सवाल अजित पवारांनी केला. शरद पवारांना हे विचारतायेत की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव का घेत नाहीत. तर मी त्यांना सांगू इच्छितो की, फक्त नाव नाही तर त्यांच्या विचाराने चालण्याचं काम पवार साहेब करत आहेत असं अजित पवार म्हणाले आहेत.