Jay Shah On Ishan Kishan And Shreyas Iyer : भारतीय क्रिकेट संघाचे स्टार खेळाडू श्रेयस अय्यर आणि ईशान किशन क्रिकेटविश्वात नेहमीच चर्चेत राहिले आहेत. इशानने वर्ल्डकप २०२३ नंतर भारतासाठी एकही सामना खेळला नाही. तसच श्रेयस अय्यर दुखापतीमुळं इंग्लंडविरोधात झालेल्या कसोटी मालिकेतून बाहेर झाला. विशेष म्हणजे ईशान किशन आणि श्रेयस अय्यरला टीम इंडियाच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून काढण्यात आलं होतं. प्रशिक्षक राहुल द्रविडनेही दोन्ही खेळाडूंना घरेलू क्रिकेट खेळण्यासाठी सांगितलं होतं. परंतु, दोघांनीही याकडे दुर्लक्ष केलं. याबाबत बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी माध्यमांशी बोलताना मोठी प्रतिक्रिया दिलीय.
काय म्हणाले BCCI सचिव जय शहा?
दोन्ही फलंदाजांना सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर काढल्यानंतर क्रिकेटविश्वात विविध चर्चांना उधाण आलं होतं. हा निर्णय कुणी घेतला? असा प्रश्न अनेकांना पडला होता. याबाबत बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी खुलासा केला आहे. शहा म्हणाले, हा निर्णय मुख्य निवडकर्ता अजित अगरकर यांनी घेतला. कारण हे दोन्ही खेळाडू (ईशान किशन आणि श्रेयस अय्यर) घरेलू क्रिकेट खेळत नव्हते. त्यांना केंद्रीय अनुबंध सूचीतून बाहेर करण्याचा निर्णय त्यांचा होता. या निर्णयाची अंमलबजावणी करून त्यांच्या जागेवर नवीन खेळाडू संघात सामील करण्याची जबाबदारी माझी होती.
आयपीएलमध्ये माझ्यात आणि ईशान किशनमध्ये सर्वसाधारण चर्चा झाली. मी त्याला कोणताही सल्ला दिलेला नाही. ही फक्त मैत्रिपूर्ण चर्चा होती. तो चांगला खेळत आहे. मी सर्व खेळाडूंबाबत अशाप्रकारे चर्चा करतो. भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवण्यासाठी सातत्याने चांगली कामगिरी करावी लागणार. जो खेळाडू हे करेल, त्याला संधी दिली जाईल, असंही जय शहा म्हणाले.