थंडीची चाहुल लागातच हवेमध्ये प्रदुषण वाढण्याचे प्रमाण अधिक वाढण्याची जास्त शक्यता असते. कारण थंडीच्या दिवसात हवेमध्ये धुक्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे हवेतील धुके आणि धूर याचे मिश्रण होऊन प्रदूषण वाढण्याची शक्यता जास्त असते. सध्या मुंबईकरांना प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. दिवाळीनंतर हवेचा गुणवत्ता स्तर खालावला आहे.
दिवाळीत फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मुंबईतील काही भागात हवेची गुणवत्ता खालावली होती. त्यानंतरही काही ठराविक भागातील हवा 'वाईट' श्रेणीतच नोंदवली जात आहे. मुंबईतील शिवडी, नेव्ही नगर कुलाबा आणि वांद्रे- कुर्ला संकुल येथील हवा मंगळवारी देखील 'वाईट' श्रेणीत नोंदली गेली.
केंद्रीय प्रदूषण निर्णायक मंडळाच्या (Central Polluton Control Board) समीर अॅपच्या नोंदीनुसार मंगळावारी रात्री 8 च्या सुमारास शिवडी, नेव्ही नगर कुलाबा आणि वांद्रे कुर्ला संकुल येथील हवा निर्देशांक अनुक्रमे 221, 226, 222 इतका होता. म्हणजेच या तिन्ही केंद्रावरील हवा धोकादायक स्तरावर होती. दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत प्रामुख्याने शिवडी, वांद्रे- कुर्ला संकुल, मालाड या विभागांमध्ये आरोग्यास हानीकारक असलेल्या हवेची नोंद झाली. फटाके व प्रदूषणविरोधी जनजागृती मोहिमेकडे मुंबईकरांनी दुर्लक्ष केल्याचे समीर अॅपच्या नोंदी दर्शवत आहेत.
दरम्यान, पावसाळ्यानंतर मुंबईतील वाऱ्यांची स्थिती बदलते, वेग मंदावतो. त्यामुळे, हवेत साचलेली धूळ, प्रदूषके यांचा निचरा होत नाही. बाष्पामुळे धुलीकण हवेतच तरंगत राहतात. या नैसर्गिक कारणांबरोबरच अनेक मानवनिर्मित कारणेही मुंबईच्या प्रदूषणात भर घालत आहेत. पायाभूत सुविधा, रहिवासी व व्यावसायिक संकुले, नवे प्रकल्प यांची बांधकामे मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. त्यातून उडणारी धूळ, हवेचा दर्जा ढासळण्यास कारणीभूत ठरत असल्याचे निरिक्षण तज्ज्ञांकडून नोंदवण्यात येत आहे.