केंद्र सरकारच्या अग्निवीर योजनेवरून (Agniveer Scheme) सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी सुरू आहे. त्यातच आता भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी केलेल्या एका विधानामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. भाजप कार्यालयाच्या सुरक्षेसाठी अग्निवीर जवानांना तैनात करण्याबद्दल विजयवर्गीय यांनी केलेलं विधान सध्या वादाचं कारण ठरतंय. आता काँग्रेस, आम आदमी पार्टी (AAP) आणि शिवसेनेने रविवारी भारतीय जनता पक्षाचे (BJP) राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांच्यावर निशाणा साधला.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यानं देशातील तरुण आणि लष्कराच्या जवानांचा अपमान केला आहे. कैलाश विजयवर्गीय यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये ते म्हणाले की, भाजप पक्ष कार्यालयाला सुरक्षा द्यायची असेल, तर अग्निवीरांना प्राधान्य दिलं जाईल. भाजप नेते पुढे म्हणतात, 'जेव्हा अग्निवीरांना लष्करी प्रशिक्षण दिलं जाईल. तो 4 वर्षांनी नोकरी सोडेल तेव्हा त्याला 11 लाख रुपये मिळतील. भाजप कार्यालयाच्या सुरक्षेसाठी मला नियुक्ती करायची असेल तर मी अग्निवीरांना प्राधान्य देईन.
भाजप नेत्याच्या या वक्तव्यावर अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून म्हटलं आहे की, 'देशातील जवान आणि लष्कराच्या जवानांचा इतका अपमान करू नका. आपल्या देशातील तरुण रात्रंदिवस परिश्रम करून मैदानी परीक्षा उत्तीर्ण होतात. कारण त्यांना सैन्यात जाऊन आयुष्यभर देशसेवा करायची असते. भाजप कार्यालयाबाहेर पहारेकरी होण्यासाठी त्यांचे कष्ट नसतात.
अग्निपथ नावाच्या या योजनेच्या माध्यमातून तरुणांना चार वर्ष सैन्यात सेवा करण्याची संधी मिळणार असल्याचं केंद्राने सांगितलं. त्यानंतर आता यावरु देशातील काही राज्यांत अग्नितांडव सुरु आहे. ही योजना मागे घेण्याची मागणी करण्यासाठी शेकडो लोकांनी गाड्या आणि रेल्वे स्थानकांची जाळपोळ आणि तोडफोड केली.'अग्निपथ' लष्करी भरती योजनेच्या विरोधात बिहारमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनांमुळे 200 कोटी रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालं आहे. एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने सांगितलं की, शनिवारी 50 डबे आणि पाच लोकोमोटिव्ह पूर्णपणे जळून खाक झाले. दानापूर रेल्वे विभागाचे विभागीय व्यवस्थापक प्रभात कुमार म्हणाले की, प्लॅटफॉर्म, कॉम्प्युटर आणि इतर तांत्रिक उपकरणांचंही मोठं नुकसान झालं आहे.
शुक्रवारी भाबुआ रोड, सिधवालिया आणि छपरा रेल्वे स्थानकांवर पॅसेंजर गाड्यांचे डझनभर डबे पेटवण्यात आले. बरौनी-गोंदिया एक्स्प्रेसचे तीन डबे जळाले. सिवान जिल्ह्यात आंदोलकांनी रेल्वे इंजिन पेटवण्याचा प्रयत्न केला. विक्रमशिला एक्स्प्रेसच्या तीन वातानुकूलित डब्यांची तोडफोड करण्यात आली.