विदर्भात तब्बल ५९,९११ ‘अग्निवीर’ म्हणजेच सैन्यात भरती होण्यासाठी तरुणांनी नोंदणी केली आहे. ‘अग्निवीर’ योजनेचसाठीच्या भरती प्रकियेला नागपुरात आजपासून सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी गोंदिया जिल्ह्यातील दोन हजार उमेदवारांची चाचणी झाली. संपूर्ण विदर्भातून तरुणांनी यात सहभाग घेतलाय. नागपूरमधील मानकापूर स्टेडीयमवर ‘अग्निवीरांची’ भरती प्रकिया सुरु आहे. यासाठी स्टेडियमवर सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली होती.
विदर्भातील दहा जिल्ह्यांतील उमेदवारांची भरती नागपुरात होत आहे. भरतीसाठी संपूर्ण प्रशासन सज्ज आहे. यासाठी शासकीय शुल्कासह बससेवेचीही सुविधा उपलब्ध राहील. वैद्यकीय सुविधासह उत्तीर्ण उमेदवारांसाठी भोजनाचीही सुविधा राहील. उमेदवारांना सैन्यात नोकरी लावून देण्याचे कुणी आमीष दाखवत असेल तर अशांपासून सावध राहा, त्याची तक्रार करा, तातडीने गुन्हा दाखल केला जाईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
१७ व १८ सप्टेंबरला गोंदिया जिल्ह्यातील अग्निवीरांची भरती होईल. १९ सप्टेंबरला गडचिरोली व वर्धा, २० सप्टेंबर चंद्रपूर, २१ सप्टेंबर यवतमाळ, २२ सप्टेंबर भंडारा, २३ सप्टेंबर अकोला २४ सप्टेंबर अमरावती, २६ सप्टेंबर अकोला व अमरावती, २७ सप्टेंबर वाशिम, २८ सप्टेंबर नागपूर , २९ वाशिम-नागपूर, ३० सप्टेंबर (सर्व जिल्हे), १ ऑक्टोबर नागपूर, अकोला व अमरावती सोडून सर्व जिल्हे, ३ ऑक्टोबर नागपूर, अकोला व अमरावती, ४ ऑक्टोबर सर्व जिल्हे, ५ ते ७ ऑक्टोबर वैद्यकीय चाचणी होईल.