Agnipath scheme protest Updates: अग्निपथ योजनेचा विरोध दिवसेंदिवस उग्र होत आहे. या आंदोलनाची आग यूपी-बिहारसह इतर अनेक राज्यांमध्ये पसरत आहे. अनेक ठिकाणी जाळपोळ झाली असून, रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे.
‘अग्निपथ योजने’मधील सैन्य भरतीच्या नव्या योजनेला विरोध शुक्रवारीही कायम आहे. सकाळीच यूपी-बिहारमध्ये अनेक गाड्या जाळण्यात आल्या आहेत. बिहारच्या विविध शहरांमध्ये तसेच यूपीच्या बलियामध्ये तरुणाई रस्त्यावर उतरली आहे. तरुणांनी बलिया रेल्वे स्थानकाची तोडफोड केली आहे. दुसरीकडे, केंद्र सरकारच्या या नव्या योजनेला राजकीय पक्षांनीही विरोध सुरू केला आहे.
केंद्राच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात बिहारमध्ये तिसऱ्या दिवशीही हिंसक निदर्शने सुरू आहेत. १९ जिल्ह्यांत मोठा गदारोळ आहे. आंदोलकांनी समस्तीपूरमध्ये दोन पॅसेंजर ट्रेन, लखीसराय, अराह आणि सुपौलमध्ये प्रत्येकी एक गाड्या जाळल्या. त्याचबरोबर बक्सर आणि नालंदासह अनेक जिल्ह्यांमध्ये रेल्वे रुळांवर जाळपोळ करण्यात आली आहे. जाळपोळीनंतर आराहमधील रस्ता जाम झाला आहे.
या जिल्ह्यांत आंदोलन
बक्सर, आरा, मुंगेर, समस्तीपूर, लखीसराय, नालंदा, अरवाल, जेहानाबाद, पाटणा-बिहता, बेगुसराय, वैशाली, औरंगाबाद, सुपौल, खगरिया, जमुई, रोहतास, नवाडा, सीतामढी येथे हिंसक निदर्शने होत आहेत.
समस्तीपूरमध्ये 2 गाड्या जाळल्या
समस्तीपूरमध्ये आंदोलकांनी दोन गाड्या पेटवल्या. यामध्ये जम्मू-तावी-गुवाहाटी एक्स्प्रेसच्या दोन बोगी उद्ध्वस्त झाल्या. पेटलेल्या बोगींमध्ये एसी कोचही आहे. येथे दिल्लीहून परतणाऱ्या बिहार संपर्क क्रांती एक्स्प्रेसलाही आग लागली आहे.