पाटणा : अग्निपथ योजनेवरून बिहारमध्ये जेडीयू आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या वादाची बातमी आता केंद्र सरकारपर्यंत पोहोचली आहे. यामुळेच केंद्र सरकारने बिहारच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह एकूण 10 नेत्यांना Y स्तरावरील सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने बिहारच्या उपमुख्यमंत्री रेणू देवी, तारकेश्वर प्रसाद, भाजप अध्यक्ष संजय जैस्वाल, बिस्फीचे आमदार हरिभूषण ठाकूर, दरभंगाचे आमदार संजय सरावगी आणि इतर अनेकांना सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गुप्तचर संस्थांच्या अहवालाच्या आधारे गृह मंत्रालयाने हा निर्णय घेतला असून, या नेत्यांना आलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं जातंय. गृह मंत्रालयाच्या या निर्णयानंतर सीआरपीएफने उपमुख्यमंत्र्यांसह सर्व नेत्यांना सुरक्षा पुरवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची केंद्राने धास्ती घेतली असल्याचं बोललं जातंय.