Agneepath Scheme Recruitment : अग्निपथ योजनेच्या विरोधातील निदर्शनाची आग जवळपास 13 राज्यांमध्ये पोहोचली आहे. त्याचा सर्वाधिक परिणाम बिहारमध्ये दिसून आला आहे. अग्निपथ योजनेला होत असलेला विरोध पाहता बिहार सरकारने 12 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कैमूर, भोजपूर, औरंगाबाद, रोहतास, बक्सर, नवादा, पश्चिम चंपारण, समस्तीपूर, लखीसराय, बेगुसराय, वैशाली आणि सारण जिल्ह्यात आजपासून 19 जूनपर्यंत इंटरनेट सेवा तात्पुरती बंद राहणार आहे. (Indian Army’s Agnipath Recruitment Scheme Protest Updates)
दुसरीकडे, उत्तर प्रदेश, हरियाणासह अनेक राज्यांमध्ये हिंसक निदर्शने सुरू आहेत. अनेक राज्यांतील आंदोलकांनी रेल्वे ट्रॅक अडवले आणि ट्रेनचे डबे पेटवून दिले, ज्यामुळे देशभरातील रेल्वे सेवा विस्कळीत झाली. या निदर्शनात हैदराबादमध्ये एकाचा मृत्यू झाला असून 15 हून अधिक जण जखमी झाले आहेत. त्याचवेळी, हरियाणा सरकारने अग्निपथ योजनेला विरोध केल्यामुळे मोबाइल इंटरनेट सेवा आणि सर्व एसएमएस सेवा पुढील 24 तासांसाठी निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
शुक्रवारी तरुणांनी गाड्यांची तोडफोड केली आणि अनेक एसी डबे पेटवून दिले. बलिया येथील रेल्वे स्थानकाची शुक्रवारी सकाळी तोडफोड करण्यात आली. सरकारने सैन्य भरतीतील वयोमर्यादेत वाढ केली आहे. या वर्षी 21 ऐवजी 23 वर्षांचे तरुण अग्निपथ योजनेंतर्गत (Agneepath Scheme) अर्ज करू शकतील. या गदारोळात हवाई दल प्रमुखांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे.
24 जूनपासून हवाई दलात भरती प्रक्रिया सुरू होणार आहे
अनेक राज्यांमध्ये सुरू असलेल्या गोंधळादरम्यान एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांनी मोठी घोषणा केली आहे. ते म्हणाले, "या वर्षी भरतीसाठी वयोमर्यादा 23 वर्षे करण्यात आली आहे, हे जाहीर करताना आनंद होत आहे. याचा फायदा तरुणांना होणार आहे. त्याच वेळी, "भारतीय हवाई दलातील भरती प्रक्रिया 24 जूनपासून सुरू होईल," अशी घोषणा त्यांनी केली.
भाजप प्रदेशाध्यक्षांच्या घरावर हल्ला
'अग्निपथ' योजनेला विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हिंसक निषेधादरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल यांच्या बेतिया येथील घरावरही हल्ला करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, घरावर दगडफेक करण्यात आली आहे. या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला आहे. दिल्लीतही निदर्शने होत आहेत.